विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशात दररोज लाखो नागरिक कोरोनावर मात करीत आहेत. मात्र, पुन्हा कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून या सर्व व्यक्ती नक्की कधी लस घेऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोरोनामधून बरे झालेल्यांनी ही लस केव्हा घ्यावी आणि कशी लागू होईल? कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांच्या लसीकरणासाठी काही विशिष्ट सूचना आहेत का? या सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊ या…
नवी दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलचे कम्युनिटी हेड डॉ. जुगल किशोर यांनी म्हटले आहे की, कोरोनातून बरे झालेल्या रूग्णाला लसीसाठी किमान ६ आठवडे थांबावे लागते. कोरोनाहून बरे झालेल्या रूग्णाला लसचा पहिला डोस मिळाला तर दुसरा डोस देखील आवश्यक आहे. साधारणतः ६ ते ८ आठवड्यांनंतर जेव्हा रुग्णाची लक्षणे संपतात, तेव्हा रुग्णाला ही लस दिली जाऊ शकते. कोरोना रूग्णांच्या लसीकरणाची प्रक्रिया सामान्य लसीकरणाच्या प्रक्रियेसारखीच आहे.
रुग्ण कोरोनामधून बरे होतात, तेव्हा त्यांच्या शरीरात अॅन्टीबॉडी बनविण्याची प्रक्रिया सुरू होते. लस देखील शरीरात जाते आणि अॅन्टीबॉडी बनवते. परंतु जर ही प्रक्रिया शरीरात आधीच चालू असेल तर समस्या उद्भवू शकते. लस मिळाल्यानंतरही, लोकांनी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे फार महत्वाचे आहे. वास्तविक ही लस मिळाल्यानंतर काही लोकांना वाटते की, मी आता सुरक्षित आहे, परंतु ही लस मिळाल्यानंतर २ ते ६ आठवड्यांपर्यंत तरी ती व्यक्ती सुरक्षित नाही.
एखाद्या संसर्ग बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या लसीकरणानंतर एखादा कोरोना बाधित त्याच्या संपर्कात आला तर त्याला पुन्हा संसर्ग होण्याचा धोका असतो. म्हणूनच, लस घेतल्यानंतरही कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे महत्वाचे आहे.
भारताची आरोग्य यंत्रणा या विषाणू विरूद्ध लढत आहे. तरीही कोरोनाची लाखो प्रकरणे रोज देशात येत आहेत, हजारो मृत्यू होत आहेत. अनेकठिकाणी ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे आणि योग्य वेळी लस घ्यावी, असे आवाहन डॉ. जुगल किशोर यांनी केले आहे.