विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे केरळ, महाराष्ट्र, गुजरातसह पाच राज्यांवर तोक्ते चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. साधारण १८ मेपर्यंत हे वादळ भारतीय किना-यावर आदळण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मदत आणि बचावकार्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. चक्रीवादळाचा धोका असलेल्या पाच राज्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) ५३ तुकड्यांना तैनात करण्यात आल्या आहेत. झाडे, विजेचे खांब कापणे, बोट आणि बचाव कार्यातील वैद्यकीय उपकरणांसह प्रत्येक तुकडीत ४० जवान तैनात आहेत.
राज्यांमधील हवामान विभाग आणि भारतीय हवामान विभागाने आगामी दिवसांच्या दृष्टिने दिशानिर्देश जारी केले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे येत्या २४ तासात चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. १६ ते १९ मेदरम्यान चक्रीवादळ अक्राळविक्राळ रूप धारण करून ठिकठिकाणी विद्ध्वंस करण्याची शक्यता आहे. १८ मे रोजी ते गुजरातच्या किनार्यावर आदळण्याची शक्यता आहे. लक्षद्वीप येथे १५ मेस मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
या राज्यांत पावसाची शक्यता
यादरम्यान तामिळनाडूच्या किनारी भागात हलका आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये १५ आणि १६ मेस मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी तसेच गोव्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ भागात १७ आणि १८ मेस मुसळधार पाऊस कोसळण्याची आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
चक्रीवादळ येण्यापूर्वी आणि वादळादरम्यान किनारपट्टीभागात १७५ किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सर्व राज्य सरकारे आणि लक्षद्वीपच्या प्रशानाला मदत आणि बचावकार्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटक आणि मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भारतीय किना-यावर प्रथमच येणार तोक्ते
किनारपट्टी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान विभागाच्या इशार्याच्या पार्श्वभूमीवर केरळ सकारकडून तिरुअनंतपुरम, कोल्लम, पथनामथिट्टा, अलप्पुझा आणि एर्नाकुलम जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात येणारा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. एनडीआरएफकडून किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. अरबी समुद्रात भारतीय किनार्यांवर आदळणारे हे या वर्षातील पहिले वादळ आहे.