विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना विरुद्धच्या लढाईत देशभरात लशीकरण मोहीम सुरू असून अनेकांना पहिला डोस मिळाला असून अद्याप दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. तर काही लोकांना अद्यापही लशीचा एकही डोस मिळालेला नाही, देशभरातील प्रत्येक राज्यातील सर्वच वयोगटातील नागरिकांना लसीचे दोन डोस मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत त्या करिता केंद्र सरकारकडून वेळोवेळी विविध उपाययोजना आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यानुसार लशीकरणासाठीचा स्लॉट (वेळ) आता व्हॉट्सअॅपद्वारेही बुक करता येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.
मांडवीया यांनी सांगितले की, नागरी सुविधेचा एक नवीन मार्ग मोकळा झाला असून आता तुम्ही काही मिनिटांत तुमच्या फोनवरून कोविड -19 लसीकरणासाठी स्लॉट सहज बुक करू शकता. यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपवर ‘मायगोव्ह व्हॉट्सअॅप हेल्पडेस्क’ वर बुक स्लॉट पाठवावा लागेल, लोकांना त्याच्या प्लॅटफॉर्मद्वारे जवळचे लशीकरण केंद्र शोधण्याची आणि स्लॉट बुक करण्याची परवानगी देईल. मायगोव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंह म्हणाले की, कोविडशी संबंधित तंत्रज्ञानाच्या उपायांमध्ये हे व्यासपीठ आघाडीवर आहे, ज्यामुळे देशभरातील लाखो लोकांना फायदा होत आहे. MyGov कोरोना हेल्पडेस्क मार्च २०२० मध्ये सुरू करण्यात आले. MyGov कोरोना हेल्पडेस्कला व्हॉट्सअॅपद्वारे ‘बुक स्लॉट’ पाठवल्यास तुमचे लसीकरण स्लॉट बुक केले जाईल. यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर 9013151515 वर व्हॉट्सअॅप करावे लागेल.
दरम्यान, यावर्षी ५ ऑगस्ट रोजी मायगोव्ह आणि व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांसाठी चॅटबॉटमधून लशीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची व्यवस्था केली होती. आजपर्यंत, व्हॉट्सअॅपद्वारे देशभरात ३२ लाखांहून अधिक प्रमाणपत्रे डाउनलोड केली गेली आहेत. त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅपवरील MyGov कोरोना हेल्पडेस्क मागील वर्षी मार्चपासून कोविडशी संबंधित माहितीचा सर्वात प्रामाणिक स्रोत म्हणून उदयास आला आहे. तसेच भारतातील ४१ दशलक्षाहून अधिक लोकांसाठी सार्वजनिक-आरोग्य संकटाशी लढण्यासाठी हे एक प्रमुख माध्यम म्हणून काम केले आहे.