विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
प्रसिद्ध इन्संट मेसेजिंग अॅप WhatsApp कडून जानेवारीपासून नव्या गोपनीय धोरण (प्रायव्हसी पॉलिसी) जाहीर केले होते. मात्र यानंतर WhatsApp वर सर्व बाजूंनी दबाव वाढल्यामुळे त्यांच्या निर्णयात बदल झाल्याचे पहायला मिळाले आहे. गोपनीय धोरण न स्वीकारणा-या युजर्सचे अकाउंट बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता WhatsApp ने निर्णयावर घूमजाव करत अट मान्य न करणा-या कोणत्याही युजरचे अकाउंट बंद करणार नाही, असे जाहीर केले आहे.
WhatsApp ने काही फिचर बंद करण्याचे जाहीर केले होते. परंतु आता प्रायव्हसी पॉलिसी न स्वीकारणा-या युजर्सचे अकाउंट बद केले जाणार नाही. तसेच फिचर मर्यादित ठेवले जाणार नाही. १५ मेच्या मुदतीनंतर सर्व युजर्सचे अकाउंट पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. तसेच सर्व फिचर उपलब्ध असतील, असे WhatsApp ने स्पष्ट केले आहे.
कठीण काळाचा दिला हवाला
लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, कोविडमुळे निर्माण झालेल्या या कठीण परिस्थितीत आपल्या कुटुंब, आप्तेष्ट, मित्रांसोबत जोडण्याचे WhatsApp हे प्रभावी माध्यम आहे. युजर्सनी गोपनीय धोरण स्वीकारो अथवा न स्वीकारो. अशा परिस्थितीत कंपनीकडून कोणतेही फिचर काढून घेतले जाणार नाही. बहुतांश युजर्सनी गोपनीय धोरणाला मजुरी दिल्याचा दावा WhatsApp ने केला आहे. ज्या युजर्सनी धोरण स्वीकारले नाही, त्यांना नोटिफिकेशन पाठवले जाईल. नव्या गोपनीय धोरणामुळे कोणत्याही युजरच्या गोपनीय माहितीला धोका नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.