अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. करण, व्हॉट्सअॅप आता तुमच्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी अनेकविध सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. व्हॉटसअॅप बिझनेस अकाऊंटद्वारे अनेक छोट्या – मोठ्या व्यावसायिकांना आपला व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत झाली आहे. आता व्हॉट्सअॅपने अधिकाधिक ग्राहकांशी कनेक्ट होण्यासाठी आणि तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यानुसार, व्हॉट्सअॅप बिझनेस अकाऊंटला अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
मेटाच्या नेटिव्ह बिझनेस मेसेजिंग कॉन्फरन्समध्ये मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी व्हॉट्सअॅप बिझनेस मेसेजिंग ऑफरच्या अपडेटची घोषणा केली आहे. मेसेजिंग अॅपच्या बिझनेस अकाऊंट ऑफरच्या अपडेटमुळे कोणत्याही प्रकारच्या व्यवसायांना व्हॉट्सअॅपवर सुरुवात करणे सोपे होईल. विनामूल्य आणि सुरक्षित क्लाउड होस्टिंग सेवादेखील यात प्रदान करण्यात येणार आहे. यामुळे व्यवसाय आणि डेव्हलपर्सला काही मिनिटांत व्हॉट्सअॅपवरुन व्यवसायाची माहिती इतरांपर्यंत पोहोचवता येईल.
याबाबत घोषणा करताना झुकरबर्ग म्हणाले की, “उत्कृष्ट व्यवसाय अनुभव लोकांना मिळावा असा आमचा उद्देश आहे. मेसेजिंग अॅपवर दर आठवड्याला एक अब्जाहून अधिक वापरकर्ते आधीपासूनच बिझनेस खात्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांना व इतरांनाही या सुविधेची मदत होईल. उत्पादनं शोधण्यासाठी, वेगवेगळ्या सेवा आणि मोठ्या तिकिटाच्या वस्तूंपासून ते दैनंदिन वस्तूंपर्यंत काहीही खरेदी करण्यासाठी या माध्यमाचा उपयोग होऊ शकेल.” या सुविधेमुळे काही मिनिटांत, कोणताही व्यवसाय किंवा डेव्हलपर या सेवेचा सहज वापर करू शकतो, व्यावसायिकांचा अनुभव चांगला करण्यासाठी मेटाद्वारे होस्ट केलेले व्हॉट्सअॅप क्लाउड API चा वापर करण्यात येणार आहे.
व्हॉट्सअॅप अतिरिक्त साधनांसह लहान व्यवसायांना प्रामुख्याने प्रोत्साहन देणार आहे. व्यवसायांसाठी ही वैशिष्ट्ये त्यांचा व्यवसाय लोकांपर्यंत नेण्यास आणि त्याचा विकास करण्यासाठी मदतीचे ठरणार आहे. याशिवाय, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी क्लिक टू चॅट लिंकदेखील प्रदान करण्यात येणार आहे. ही वैशिष्ट्ये अतिरिक्त आणि पर्यायी असतील आणि विशिष्ट शुल्क घेऊन व्यवसाय खाते वापरकर्त्यांना दिली जातील.