अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
व्हॉट्सअॅपवर सतत नवनवीन फीचर्स येत असतात. काही दिवसांपूर्वी आलेले पेमेंट फीचरही लाँच करण्यात आले. या फिचरमध्ये वापरकर्त्याना फक्त एक क्यूआर कोड स्कॅन करुन, रक्कम भरावी लागते आणि पैसे ट्रान्सफर केले जातात. मात्र, ही प्रक्रिया सुलभ झाल्याने आता फसवणूक करणाऱ्यांचे डोळेही त्यावर लागले आहेत. काही स्कॅमर गुन्हे करण्यासाठी क्यूआर कोड प्रणाली वापरत आहेत आणि ते तुमची फसवणूक करू शकतात.
काय आहे हा घोटाळा?
क्यूआर कोड ही ऑनलाइन पेमेंटची सोपी पद्धत समजली जाते. मात्र यातून फसवणूक करणारेही लोकांना मूर्ख बनवण्याचे काम करत आहेत. तुम्ही एखादी वस्तू विकल्यास, फसवणूक करणारे तुमचे उत्पादन खरेदी करण्याचे नाटक करतात. यानंतर, ते तुमच्यासोबत व्हॉट्सअॅपवर एक क्यूआर कोड शेअर करतात, गुगल पे किंवा इतर यूपीआय आधारित ऍप्लिकेशनद्वारे स्कॅन करण्यास सांगतात, जेणेकरून पैसे तुमच्या बँक खात्यात जमा करता येतील. फसवणूक करणाऱ्याचं सांगणं पाळल्याने तुम्हाला पैसे मिळण्याऐवजी बँक खाते रिकामे होते. वास्तविक, तुम्ही कोड स्कॅन करताच, तो तुम्हाला MPIN मागेल आणि तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील.
फसवणूक टाळण्यासाठी
१. ज्यांना ऑनलाइन पेमेंटचे फारसे ज्ञान नाही, त्यांनी त्याबद्दल माहिती घेणे किंवा रोखीने व्यवहार करणे केव्हाही चांगले.
२. जेव्हा तुम्हाला एखाद्याला पेमेंट करण्याची आवश्यकता असते, तेव्हा तुम्ही नेहमी व्हॉट्सअॅप वर क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर नाव किंवा यूपीआय आयडी दोनदा तपासा आणि नंतर पेमेंट करा.
३. लक्षात ठेवा की पैसे मागवण्यासाठी तुम्हाला कधीही MPIN टाकावा लागत नाही. तुमच्या बाजूने पेमेंट देय असेल तेव्हाच तो टाकावा लागतो.