पुणे – नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरताना तुम्हाला शानदार अनुभव मिळणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. २०२२ या वर्षात अॅपमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त फिचर्स मिळणार आहेत. व्हॉट्सअॅपने या वर्षी अँड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी अनेक फिचर्सचे अनावरण केले आहे. परंतु पुढील वर्षी हे अॅप अधिक प्रगत होणार आहे. २०२२ मध्ये मेटा कंपनीतर्फे व्हॉट्सअॅपवर मनोरंजक आणि अद्वितीय फिचर्स देण्यात येणार आहे. ते कोणते फिचर्स असतील हे जाणून घेण्यासाठी तुम्हीसुद्धा उत्सुक असताल. तर चला मग वेळ न दवडता जाणून घेऊया.
इन्स्टाग्राम रिल्स व्हॉट्सअॅपवर
मेटा कंपनीकडून व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसह सर्व प्लॅटफॉर्म एकीकृत करण्याचे काम करण्यात येत आहे. पुढील वर्षी याच धर्तीवर कंपनी काम करणार आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर इन्स्टाग्राम रिल्स येण्याची शक्यता आहे. परंतु कोणते फिचर्स येणार आहेत याविषयी अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
व्हॉट्सअॅप लॉगआउट
व्हॉट्सअॅपमधील डिलिट अकाउंट हा पर्याय बदलून व्हॉट्सअॅप लॉगआउट हा पर्याय येण्याची शक्यता आहे. डिलिट अकाउंटचा पर्याय वापरला तर चॅट, मीडिया फाइल्ससह युजरचे अकाउंटच डिलिट होते. परंतु व्हॉट्सअॅप लॉगआउट या पर्यायामुळे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने अॅपवरून ब्रेक घेऊ शकणार आहात. युजर्स हवे तेव्हा लॉगइन आणि लॉगआउट करू शकणार आहेत.
मल्टिडिव्हाइस सपोर्ट पब्लिक रिलिज
व्हॉट्सअॅपने या वर्षी मल्टिडिव्हाइस सपोर्टचे अनावरण केले आहे. हे फिचर सध्या अँड्रॉइड आणि आयओएस युजर्सच्या बिटा युजर्ससाठी उपलब्ध आहे. आगामी वर्षात व्हॉट्सअॅपतर्फे अधिकृतरित्या सर्वांसाठी मल्टिडिव्हाइस सपोर्ट जारी करण्याची शक्यता आहे. हे फिचर स्थिर इंटरनेट जोडणीशी जोडल्या गेलेल्या प्राथमिक डिव्हाइसशिवाय आपल्या व्हॉट्सअॅप अकाउंटमध्ये प्रवेश करण्यास परवानगी देणार आहे.
डिलिट मेसेज फॉर एव्हरीवनसाठी हा नियम
व्हॉट्सअॅपवर यापूर्वीच आयओएससह अँड्रॉइड युजर्स असणार्या सर्वांसाठी डिलिट फिचर सादर करण्यात आले आहे. आगामी वर्षात व्हॉट्सअॅपचे लक्ष्य टाइम लिमिट हटविण्याचे असेल. हे फिचर वापरकर्त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी पाठविलेले मेसेज जेव्हा वाटेल तेव्हा हटविण्याची परवानगी देईल. कंपनीकडून अद्याप हे फिचर कार्यान्वित करण्यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.
स्पेसिफिक कॉन्टॅक्ट्सचे लास्ट सीन लपणार
व्हॉट्सअॅपने यापूर्वीच तीन पर्यायांसह लास्ट सीन हे फिचर प्रदान केले आहे. त्यामध्ये everyone, nobody and my contacts चा समावेश आहे. आता युजर्सना विशिष्ट लोकांपासून लास्ट सिन लपविण्याची परवानगी देण्याच्या फिचरवर मेसेजिंग अॅप काम करत आहे. व्हॉट्सअॅप स्टेटस प्रमाणे हे फिचर युजर्सना एक किंवा एकापेक्षा अधिक कॉन्टॅक्टपासून लास्ट सिन लपविण्याची परवानगी देणार आहे.