पुणे – सोशल मीडियाचे प्रसिद्ध प्लॅटफॉर्म समजले जाणार्या व्हॉट्सअॅपवर असंसदीय किंवा घाणेरड्या भाषेत तसेच समाजात तेढ निर्माण करणारे, दंगल भडकविणारे प्रक्षोभक मेसेज पाठविणार्या असामाजिक तत्वांनी आता सावध राहावे. कारण व्हॉट्सअॅपने आता असे सुरक्षा फिचर कार्यान्वित केले आहे ज्याने अशा नागरिकांवर लगाम लावणे सोपे ठरणार आहे.
अँड्रॉइड मोबाइलधारकांसाठी व्हॉट्सअॅपकडून दोन सुरक्षा फिचर्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यापैकी व्हॉट्सअॅप मेसेज लेव्हल रिपोर्टिंग फिचर हे एक फिचर आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर असंसदीय भाषेत किंवा घाणेरड्या शब्दात मेसेज पाठविणार्यांवर लगाम कसण्यासाठी हे फिचर कार्यान्वित करण्यात आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून व्हॉट्सअॅफवर समाजात तेढ निर्माण करणारे आणि दंगल भडकावणार्या मेसेजची संख्या वाढत आहे. असे मेसेज पाठविणारे असामाजिक तत्व सरकार आणि व्हॉट्सअॅपपासून लांब असतात. त्यामुळे हे फिचर खूपच महत्त्वाचे मानले जात आहे.
केंद्र सरकारचा दबाव
दंगल भडकावणारे आणि घाणेरडे मेसेज पाठवणार्या युजर्सची ओळख पटवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकार व्हॉट्सअॅपवर दबाव वाढवत आहे. परंतु एंड टू एंड एन्क्रिप्शनचा हवाला देत व्हॉट्सअॅपकडून असे मेसेज पाठविणार्या नागरिकांची नावे उघड केले जात नाही. परंतु व्हॉट्सअॅपचे नवे फिचर आल्यानंतर अशा नागरिकांची ओळख पटविणे सोपे ठरणार आहे. नव्या माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) कायद्यांतर्गत अशा नागरिकांविरुद्ध कारवाई करणे व्हॉट्सअॅपला बंधनकारक करण्यात आले आहे.
कसे काम करेल नवे फिचर
व्हॉट्सअॅपचे नवे मेसेज लेव्हल रिपोर्टिंग फिचर आल्यानंतर जर एखादा युजर घाणेरडे मेसेज पाठवत असेल तर असे मेसेज तुम्ही रिपोर्ट करू शकतात. तसेच संबंधिताला ब्लॉक करण्याचा पर्यायही मिळणार आहे. त्यासाठी मेसेजवर दीर्घकाळ प्रेस करून त्याला रिपोर्ट किंवा ब्लॉक करू शकता.
तर व्हॉट्सअॅप अकाउंट बंद
जर कोणत्याही व्हॉट्सअॅप मेसेजवर २५ हून अधिक युजर्सनी रिपोर्ट केले असेल, तर व्हॉट्सअॅप असे अकाउंट बंद करणार आहे. तसेच अशा युजर्सबद्दलचा अहवाल सरकारकडे सुपूर्द केला जाणार आहे. नव्या आयटी कायद्यानुसार सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दर महिन्याला सरकारकडे एक अहवाल सादर करतात. यामध्ये किती तक्रारी मिळाल्या आणि त्यावर काय कारवाई झाली, याबद्दल माहिती दिलेली असते. त्यामुळे असे मेसेज पाठविणार्या नागरिकांनी सावध राहावे.








