मुंबई – फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम हे सोशल मीडियावरील प्रसिद्ध अॅप्स सोमवारी रात्री जगभरात अचानक बंद झाल्याने एकच खळबळ उडाली. रात्री नऊ ते पहाटे चार वाजेपर्यंत हे सर्व अॅप्स बंद झाल्याने युझर्सला प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यामुळेच वैतागलेल्या युजर्सनी या तिन्ही अॅप्सची सोशल मिडियावर चांगलीच खिल्ली उडवली. काहींनी कठोर टीका केली आहे तर काहींनी निखळ विनोद केला आहे. सोशल मिडियाचा उगम झाल्यापासून सर्वाधिक लोकप्रिय अॅप्स पहिल्यांदाच तब्बल सात तासांसाठी बंद राहिले.
अॅप्स बंद झाल्यानंतर इंटरनेट तर डाउन नाही ना, याची पडताळणी बहुतांश युजर्सनी केली. डाउनडिटेक्टर डॉट कॉम या आउटेज ट्रेकिंग कंपनीच्या माहितीनुसार, ८० हजारांहून अधिक युजर्सनी व्हॉट्सअॅप आणि ५० हजारांहून अधिक युजर्सनी फेसबुक बंद झाल्याची तक्रार नोंदवली. युजर्स फेसबुक आणि इन्स्टाग्राम न्यूज फिड अपडेट करू शकले नाहीत. व्हॉट्सअॅप युजर्ससुद्धा एकही मेसेज पाठवू शकले नाही.
फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम हे तिन्ही अॅप्स एकाच कंपनीचे आहेत. सेवा ठप्प झाल्यानंतर काही युजर्सना फेसबुक वापरताना समस्या येत आहे. त्यासाठी आम्ही माफी मागतो. लवकरच सेवा सुरू होईल, असे फेसबुकने म्हटले आहे. तर आम्हाला ठाऊक आहे की व्हॉट्सअॅप युजर्सना समस्या निर्माण झाली आहे. सर्व सुरळीत करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. लवकरच त्याची माहिती देऊ. तुम्ही दाखविलेल्या धैर्याबद्दल धन्यवाद, असे व्हॉट्सअॅपने प्रसिद्ध केलेल्यान निवेदनात म्हटले आहे. भारतात व्हॉट्सअॅपचे ५३ कोटी, फेसबुकचे ४१ कोटी आणि इन्स्टाग्रामचे २१ कोटी युजर्स आहेत.
शेअर्स ५.५ गडगडले
फेसबुकचे सर्व्हर डाउन झाल्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही झाला आहे. फेसबुकचे शेअर्स ५.५ टक्क्यांपर्यंत गडगडले. गेल्या एक वर्षातील सर्वात वाईट प्रदर्शनाकडे फेसबुकची वाटचाल सुरू आहे.
मिम्सचा पाऊस
फेसबुक डाउन झाल्यानंतर ट्विटरवर मिम्सचा पाऊस पडला. काही युजर्सनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये खूप गर्दी दिसत आहे. युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप डाउन झाल्यानंतर सर्व सोशल मीडिया युजर्स ट्विटरकडे येत आहेत. एका युजरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक मुलगा झोका घेत आहे. त्याच्याजवळ आग लागलेली आहे. जो मुलगा झोका घेत आहे ते ट्विटर आहे, आणि आगीजवळ असलेले लोक व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम आहे, असे दर्शविण्यात आले आहे.
https://twitter.com/PicklesGB/status/1445081977560961031