नवी दिल्ली – व्हॉट्सअॅप युजर्सच्या लॉग इन डिटेल्समध्ये सायबर गुन्हेगार बेधडक घुसखोरी करत असल्याने व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, फेसबुक मॅसेंजरसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या फिशिंग संकेतस्थळांवर आपले खासगी लॉग इन डिटेल्स, पासवर्ड आणि ईमेल आयडी शेअर करू नये, असा इशारा व्हॉट्सअॅपकडून युजर्सना देण्यात आला आहे. फिशिंग संकेतस्थळ व्हॉट्सअॅपच्या खऱ्या संकेतस्थळासारखेच दिसत असल्याने युजर्स अगदी सहज सायबल गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत.
तिन्ही सोशल मीडिया प्लॅडफॉर्मची मूळ कंपनी असलेल्या मेटाने युजर्सना हा इशारा दिला आहे. सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅप अकाउंटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व युजर्सना या धोक्याची माहिती असणे आवश्यक आहे. जवळपास ३९ हजार संकेतस्थळे बनावट लॉगिन पेजच्या माध्यमातून युजर्सची माहिती चोरण्याचा प्रयत्न करत अससल्याचे आढळले आहे. व्हॉट्सअॅपच नव्हे, तर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि मॅसेंजर यासारख्या मेटाच्या इतर कंपन्यासुद्धा गुन्हेगारांच्या जाळ्यात आल्या आहेत.
भोळेभाबडे युजर्स जाळ्यात
नवा फिशिंग घोटाळा व्हॉट्सअॅपच्या युजर्सना प्रभावित करत आहे. सायबर गुन्हेगारांकडून पीडितांना कंपन्या, बँका इतर संस्थांचे खरे संकेतस्थळ असल्याचे भासवून लुभावतात. परंतु अशी संकेतस्थळे खोटी असतात. पासवर्ड किंवा ईमेल अॅड्रेससारखी संवेदनशील माहिती नोंदविण्यास उद्युक्त करण्यासाठी या फेक संकेतस्थळांंची रचना करण्यात आली आहे. एखाद्या विचित्र लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खोट्या व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम पेजवर ती लिंक घेऊन जाईल. अशा पेजवर भोळेभाबडे युजर्स आपले लॉगिन आणि पासवर्ड शेअर करतात आणि अखेर आपला पैसा गमावतात.
३९ हजारांहून अधिक संकेतस्थळे
मेटाने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक, मॅसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या लॉगिन पेजची कॉपी करून ३९ हजारांहून अधिक फिशिंग संकेतस्थळे बनविण्यात आले आहेत. ही संकेतस्थळे युजर्सना युजरनेम आणि पासवर्ड नोंदविण्यास प्रेरित करतात. त्यानंतर ते इंटरनेटवरील ट्रॅफिकला फिशिंग संकेतस्थळांवर रिडायरेक्ट करण्यासाठी एका रिले सर्व्हिसचा वापर करतात. त्यामुळे गुन्हेगारांकडून करण्यात आलेल्या हल्ल्याच्या पायाभूत सुविधा अस्पष्ट दिसतात.
गुन्हेगारांवर खटला दाखल
डेटा चोरी करणार्या संकेतस्थळांशी सामना करण्यासाठी मेटाने सायबर गुन्हेगारांवर खटला दाखल केला आहे. आपल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये फेसबुक म्हणाले, की फिशिंग हल्ल्यातून युजर्सना वाचविण्यासाठी आज आम्ही कॅलिफोर्नियाच्या एका न्यायालयात एक खटला दाखल केला आहे. जर तुम्हाला कोणत्याही संकेतस्थळावर जाऊन फेसबुकचा मालकी हक्क असलेल्या कंपन्यांच्या पेजवरील अकाउंटवर लॉगिन करा असे सांगणारा ईमेल, टेक्स्ट किंवा व्हॉट्सअॅपवर मेसेज मिळाला, तर त्यावर तुमचे डिटेल्स कधीही शेअर करू नका, असे आवाहन मेटाकडून करण्यात आले आहे.
कशी ओळखावी संकेतस्थळे
बनावट संकेतस्थळे ओळखण्यासाठी युजर्सनी यूआरएलची तपासणी करावी. फेसबुकचे सर्व ईमेल fb.com, facebook.com किंवा facebookmail.com या संकेतस्थळावरून येतात. कोणीही नेहमी www.facebook.com या पेजवर जाऊ शकतो. किंवा महत्त्वाच्या मेसेजचा तपास करण्यासाठी फेसबुक अॅप उघडू शकतात.