इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या घरी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या मोलकरणींवर आपण विश्वास ठेवतो. घरी नसताना त्यांच्या हाती चावी देतो. संपूर्ण घर त्यांच्या भरवश्यावर सोडून जातो. हे केवळ विश्वासाच्याच जोरावर शक्य आहे. पण या विश्वासाला तडा देणारी एक घटना भोपाळमध्ये घडली. एका डॉक्टरकडे काम करणारी मोलकरीण रोज थोडी थोडी चोरी करत होती, असे उघडकीस आले.
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका डॉक्टर दाम्पत्याच्या घरी दररोज चोरी होत होती. पण त्यांना त्याची खबर नव्हती. किमान एक वर्षापेक्षा जास्त काळ ही चोरी सुरू होती. एक दिवस घरातील महागाचे दागीणे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. डॉ. भुपेंद्र श्रीवास्तव यांचे खासगी रुग्णालय आहे. त्यांनी पोलिसांत तक्रार देताना एक अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. गेल्या काही वर्षांमध्ये घरातील मौल्यवान वस्तू आणि दागिणे गायब होत असल्यामुळे आम्ही तातडीने मोलकरणीला कामावरून काढले, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.
चोरीच्या संशयावरूनच मोलकरणीला वीस दिवसांपूर्वी कामावरून काढल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांचे काम सोपे झाले. त्यांनी डॉक्टर दाम्पत्याला मोलकरणीचा संपर्क आणि पत्ता विचारला. त्यावर डॉक्टरच्या पत्नीने आपल्याकडे मोबाईल नंबर आहे, असे सांगितले आणि नंबर शोधताना चुकीने तिला व्हॉट्सएपला शोधले. त्यात ८ हजार रुपये पगार असलेली मोलकरीण एखाद्या धनाड्य महिलेसारखी सजलेली दिसली. आणि तिच्या गळ्यात, कानात जे दागीणे होते ते सगळे डॉक्टरच्या पत्नीचे होते. ते बघून पोलीसही थक्क झाले. विशेष म्हणजे डॉक्टरच्या पत्नीला मोलकरणीच्या फोटोत जे कानातले दिसले ते आपलेच आहेत, असा दावा करण्यापूर्वी तिने लॉकर उघडून बघितले. तर कानातलेच सोडा इतरही दागीणे गायब असल्याचा धक्का त्यांना बसला.
५० लाखांचे दागीणे; पाच लाखाची रोकड
मोलकरणीला अटक केल्यावर तिने आतापर्यंत ५० लाख रुपयांचे दागीणे चोरले असून ५ लाखांची रोकडही चोरली आहे, अशी कबुली दिली. कुठल्याही फंक्शनला जाण्यासाठी मी मालकीणबाईंचे दागीणे घालायची, असेही तिने सांगितले. पोलिसांनी सोन्याच्या बांगड्या, नेकलेस, कानातले तिच्याकडून जप्त केले. तर डॉक्टरच्या पत्नीचे महागडे कपडेही तिच्याकडून जप्त केले.
एसीसह सर्व सुविधा
डॉक्टरकडे आठ हजार रुपये पगारावर काम करणाऱ्या मोलकरणीच्या घरी एसी, सोफासेटसह अनेक महागड्या गोष्टी आढळल्या. तिच्या शेजाऱ्यांना शंका येत होती. एवढ्या कमी पगारात एवढे महागडे शोक कसे पुरविले जाऊ शकतात, असा प्रश्नही पडायचा. पण नंतर सारेकाही उघडकीस आले.
Whatsapp DP Police Investigation Theft