नवी दिल्ली – व्हॉट्सअॅप या प्रसिद्ध मेसेजिंग अॅपला टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या अॅप्सकडून आव्हान मिळत आहे. स्पर्धेत टिकाव धरून ठेवण्यासाठी व्हॉट्सअॅपला नवे फिचर आणणे आवश्यक झाले आहे. व्हॉट्सअॅप आता फोटो स्टिकरच्या रूपात पाठविण्याची सुविधा देण्याचे फिचर आणणार आहे, असा दावा नुकत्याच आलेल्या एका अहवालात करण्यात आला होता. व्हॉट्सअॅप आता नवे दोन फिचर सादर करणार असल्याची माहिती समजते. व्हॉट्सअॅपच्या बिटा चॅनलवर हे फिचर कार्यान्वित होतील.
व्हॉट्सअॅप व्हिडिओ कंट्रोल
व्हॉट्सअॅप व्हिडिओ कंट्रोल हे व्हॉट्सअॅपचे नवे फिचर आहे. हे फिचर व्हॉट्सअॅपच्या आयओएसवर उपलब्ध असेल. त्याअंतर्गत व्हॉट्सअॅपच्या इंटरफेसमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ते व्हिडिओ पाठवता आपल्याला दिसतील. सध्या व्हॉट्सअॅपमध्ये सहा सेकंदाहून कमी वेळेचा लहान व्हिडिओ पाठविला तर तुम्हाला जीआयएफमध्ये कन्व्हर्ट करण्याचे बटन दिसेल. जर व्हिडिओ सहा सेकंदाहून मोठा असेल तर सेंड हे बटन दिसेल.
आता आयओएस बिटा अॅपमध्ये व्हॉट्सअॅप अपडेट करण्यात आले आहे. हे अपडेट व्हिडिओवर जास्त कंट्रोल देईल. नव्या युजर इंटरफेसमध्ये व्हिडिओ पाठविताना जीआयएफ टॉगल बटनच्या विरुद्ध दिशेला एक बटन असेल. ते व्हिडिओ म्यूट करण्यासाठी बनविले आहे. व्हिडिओच्या आकार आणि लांबीची माहिती देणारा व्हिडिओ म्यूट बटनाच्या शेजारी एक टाइल असेल. WABetalnfo च्या माहितीनुसार, प्रत्येक वेळी व्हिडिओ एडिट केल्यानंतर व्हिडिओची लांबी आणि आकार त्वरित अपडेट होईल.
व्हॉट्सअॅप ग्रुप कॉल शॉर्टकट
व्हॉट्सअॅप ग्रुप कॉल शॉर्टकट हे व्हॉट्सअॅपचे दुसरे फिचर अँड्रॉइड बिटावर उपलब्ध असेल. व्हॉट्सअॅपने आपल्या ग्रुप कार्ड सेक्शनमध्ये ग्रुप व्हॉइस कॉल आणि ग्रुप व्हिडिओ आयकॉन जोडलेले आहेत. विशेष म्हणजे वैयक्तिक चॅटसाठी शॉर्टकट हा पर्याय पूर्वीपासूनच उपलब्ध आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, नवे फिचर आल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअॅप ओपन करून ग्रुपच्या डीपीवर टॅप करा, तेव्हा कॉलिंग आयकॉनच्या बरोबर खाली दिसतील. त्यासाठी तुम्हाला ग्रुपमध्ये जाण्याची गरज नाही.