नवी दिल्ली – सध्या व्हॉट्सअॅपवर व्हेरिफिकेशन कोड स्कॅमच्या माध्यमातून युजर्सची फसवणूक केली जात आहे. याद्वारे सायबर गुन्हेगार युजर्सचे व्हॉट्सअॅप अकाउंटचे पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकतात. व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक वापरले जाणारे अॅप असल्याने सायबर गुन्हेगारांचे या अॅपकडे लक्ष आहे. विशेष म्हणजे अकाउंट हॅक करताना सायबर गुन्हेगार संबंधित लोकांच्या नातेवाईक, मित्रांच्या नावाचा वापर करत आहेत.
व्हेरिफिकेशन कोड स्कॅम काय आहे
व्हेरिफिकेशन कोड स्कॅममध्ये युजर्सना टेक्स्ट मेसेजमध्ये व्हॉट्सअॅपचा लॉगइन कोड प्राप्त होतो. हा टू फॅक्टर ऑथेंटिकेशन कोड असतो. त्याच्या माध्यमातून युजर नोंदणीकृत व्हॉट्सअॅप अकाउंट नंबरमध्ये लॉगइन करू शकतो. या घोटाळ्यात सायबर गुन्हेगार जवळचे मित्र आणि नातेवाईकांना मेसेज पाठवतो आणि चुकून व्हॉट्सअॅप लॉगइन कोड त्यांना पाठवला गेला असे सांगतो. हा को़ड तुम्ही चुकून परत पाठवला तर तुमचे अकाउंट हॅक केले जाते. तुम्हाला असा मेसेज आला तर त्याला कोणत्याही परिस्थितीत प्रत्युत्तर देऊ नका. तो कोड कोणालाही शेअर करू नका. व्हॉट्सअॅप कोणत्याही नंबरवर व्हेरिफिकेशन कोड पाठवत नाही. व्हेरिफिकेशन कोड तुमच्या नंबरचा असतो. हा नंबर जर तुम्ही कोणालाही पाठविला तर तो तुमच्या अकाउंटवर नियंत्रण मिळवू शकतो. असा कोणताही मेसेज तुम्हाला आला तर समजून घ्या की सायबर गुन्हेगार तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
यातून कशी करावी सुटका
तुम्ही सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात फसले तरी चोरी झालेल्या व्हॉट्सअॅप अकाउंट पुन्हा मिळवू शकतात. त्यासाठी काही स्टेप्सना तुम्हाला फॉलो करावे लागेल. तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅपमध्ये साइनइन करून एसएमएसच्या माध्यमातून मिळालेल्या सहा आकड्यांच्या कोडला नोंदवून आपला नंबर व्हेरिफाय करावा. एकदा तुम्ही सहा आकडी नंबरचा एसएमएस कोड नोंदविला की तुमचे अकाउंट वापरणारा व्यक्ती स्वतः लॉगआउट होतो. तुम्हाला टू स्टेप व्हेरिफिकेशन कोड प्रदान करण्यासाठीसुद्धा सांगितले जाऊ शकतो. जर तुम्हाला तो कोड माहीत नसेल, तर तुमचे अकाउंट हाताळणार्या व्यक्तीने टू स्टेप व्हेरिफिकेशनला इनेबल केले असेल, असेही होऊ शकते. विना टू स्टेप व्हेरिफिकेशन कोडच्या व्हॉट्सअॅपमध्ये साइनइन करण्यासाठी तुम्हाला सात दिवसांची वाट पाहावी लागू शकते.