नवी दिल्ली – व्हॉट्सअॅप हे मेसेजिंगसाठी अत्यंत लोकप्रिय अॅप आहे. याची लोकप्रियता टिकवण्यासाठी यात सातत्याने काही ना काही अपडेट केले जातात. नुकतेच असे एक फीचर आले आहे, ज्यामुळे तुम्हाला हवा तो व्हिडीओ तुम्ही समोरच्याला पाठवू शकाल, पण त्यातला आवाज म्यूट करून. कंपनीने नुकतेच हे फीचर आणले आहे.
अनेकदा आपल्याला एखादा व्हिडीओ पाठवायचा असतो, पण त्यात जे काही संभाषण झाले आहे, ते समोरच्याला कळावे, अशी आपली इच्छा नसते. तेव्हा तुम्हाला या फीचरचा निश्चित फायदा होईल.
हा व्हिडीओ पाठवण्यासाठी काय कराल?
व्हॉट्सऍपवर व्हिडीओ पाठवण्यापूर्वी जर तुम्हाला तो म्यूट करायचा असेल तर तुम्हाला काही सोप्या गोष्टी कराव्या लागतील. तुम्हाला जो व्हिडीओ पाठवायचा आहे, तो शूट करा किंवा मग गॅलरीतला एखादा व्हिडीओ सिलेक्ट करा. त्यानंतर शेअर बटणावर क्लिक करा. ते केल्यावर तुम्हाला व्हॉट्सऍपद्वारे शेअर करायचा ऑप्शन दिसेल.
व्हॉट्सऍपवर पाठवण्यापूर्वी त्यावर एडिट करण्याचा ऑप्शन दिसेल. एडिट करून झाल्यावर उजवीकडे वरती तुम्हाला एक स्पीकरचा आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक केले की, व्हिडीओ म्यूट होईल. मग तुम्ही तो सेंड करा. समोरच्याला व्हिडीओ मिळेल, पण त्यातील आवाज ऐकू येणार नाही. याच आयकॉनवर क्लिक करून तुम्ही व्हिडीओ अनम्यूटही करू शकता.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हे सगळे करण्यापूर्वी व्हॉट्सऍप अपडेट करायला विसरू नका. कारण ते अपडेट झाल्यानंतरच तुम्हाला हे म्यूट फीचरचा वापर करता येईल.