नवी दिल्ली – अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर भारताच्या कुटनीतिक गोटात गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. तालिबानचे शासन दहशतवादविरोधी लढ्यात भारतासह इतर देशांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय व्यापार आणि गुंतवणूकीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. चीन आणि पाकिस्तानशी तालिबानशी असलेल्या राजकीय संबंधांमुळेसुद्धा भारतासमोर मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
नव्याने रणनीती
भारताने अफगाणिस्तानमध्ये तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. त्याची सुरक्षा आणि आणि चाबाहारच्या विस्तारासाठी भारताला नव्याने रणनीती बनवावी लागणार आहे.
पर्यायी शोध
तालिबान एखाद्या कराराअंतर्गत काबुलला पोहोचले की बंदूक आणि दहशतवादाच्या जोरावर सत्ता मिळविण्यात यशस्वी झाले, हे आधी भारताला पाहावे लागणार आहे. जर त्यांनी दहशतीच्या जोरावर सत्ता काबिज केली असेल, तर भारतासह संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्व सदस्य देशांनी तालिबानी सत्तेला फेटाळून लावले पाहिजे. तसेच एकमताने पर्यायी व्यवस्था करण्याची योजना आखली पाहिजे. त्यामध्ये आर्थिक मदत रोखण्यासह इतर पर्यायांचा समावेश आहे.
चीन-पाकिस्तान
तालिबानबद्दल पाकिस्तान आणि चीन कोणती भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे. परंतु भारताला आपल्या रणनीतिक भूमिकेकडे लक्ष द्यावे लागेल. आपल्या लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची गरज आहे. नंतर भारताला अफगाणिस्तानात निर्माण केलेल्या पायाभूत सुविधांना नुकसान होऊ नये याकडे लक्ष द्यावे लागेल.
अनेक आव्हाने
तालिबानने त्याच्या स्वभावानुसार कट्टर भूमिका स्वीकारली, तर आयएसआय आणि तालिबान यांच्या भागिदारीचे मोठे आव्हान काश्मीरमध्ये उभे ठाकणार आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये (पीओके) चीन-अफगाणिस्तानच्या माध्यमातून बीआरआयच्या विस्ताराची योजना बनवू शकते.
दहशतवादी होणार बळकट
पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या लष्कर-ए-तोय्यबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटना तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर तिथे आपले बस्तान बसवू शकतात. अफगाणिस्तावर तालिबानच्या नियंत्रणानंतर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांचा प्रभाव अफगाणिस्तानात वाढेल, असे काही तज्ज्ञांना वाटते.
चाबहारवर परिणाम
भारत-अफगाणिस्तान व्यापाराच्यादृष्टीने मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चाबहार या बंदरावर विकासकामांच्या विस्ताराची योजना आखण्यात आता मोठे अडथळे निर्माण होऊ शकतात. चीन आणि पाकिस्तान तालिबानच्या मदतीने यामध्ये खोडा टाकण्याची शक्यता आहे. ग्वादर पोर्टला अधिक झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. भारताकडून निर्माण करण्यात आलेला जरांज-डेलाराम महामार्ग आणि सलमा धरणासह अनेक मोठ्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्या प्रसल्पांना तालिबानकडून धोका निर्माण झाला आहे.