विशेष प्रतिनिधी, मुंबई
गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे मोठे संकट देशावर आहे त्यातच लॉकडाऊनमुळे काही काळ उद्योगधंदे बंद असल्याने आणि इंधनाचे दर गगनाला भिडल्याने देशवासीयांचे जीवन बेचैन झाले आहे उत्तर प्रदेश, बिहारात गंगेत प्रेते तरंगत असून वाहतही आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची स्थिती नक्कीच नियंत्रणाखाली आहे. देवेंद्र फडणवीस – शरद पवार भेटीत हा विषयही चर्चेला आला असेलच. पवार-फडणवीस भेटीत रहस्य किंवा गूढ असे काहीच नाही. कोणाला त्यात रहस्यमय वगैरे वाटत असेल तर ‘ते’ लोक पवारांना ओळखत नाहीत असेच म्हणावे लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे.
फडणवीस-पवार भेटीबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अनेक सरकारे बनवली व पाडली असतील , मात्र आजचा विरोधी पक्ष ज्या पद्धतीने वागत आहे त्यावर पवार यांनी फडणवीसांना नक्कीच चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या असतील. तसेच कोणीही सदा सर्वकाळ सत्तेवर राहत नाही. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेला नाही.
राम-कृष्णही आले-गेले तेथे आजचे राजकारणी कोण? पवारांचे चाहते देवेंद्र फडणवीस हे पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटले. आता ही भेट नक्की कशासाठी झाली? काहीतरी राजकारण शिजत आहे. फडणवीस हे उगाच जाऊन असे भेटणार नाहीत. वरचा काहीतरी निरोप वगैरे घेऊनच फडणवीस गेले. त्यामुळे ‘ऑपरेशन कमळ’ वैगेरे सारखे फुगे सोडण्याचे काम काही लोकांकडून सुरू झाले. तर फडणवीस यांच्या म्हणण्याप्रमाणे ही निव्वळ सदिच्छा भेटच होती व ते खरेच आहे. त्यातच पवार हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर राष्ट्रीय राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. पंतप्रधान मोदींपासून इतर अनेक पक्षांतील लोक त्यांच्याशी सल्लामसलत करीत असतात. आपल्या लोकशाहीचे हे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य आहे. लोकशाहीत विरोधी पक्षाचे स्थान महत्त्वाचे आहे. काही नेत्यांकडे राजकारणापलीकडे जाऊन पाहायला हवे व आज शरद पवार त्यापैकीच एक प्रमुख नेते आहेत. म्हणूनच देवेंद्र फडणवीस हे पवारांना भेटले. यात वाकडा अर्थ काढण्याची गरज नाही. भेटले असतील तर बरेच झाले.
बऱ्याच काळानंतर फडणवीस हे योग्य व्यक्तीला भेटले. त्या भेटीतून त्यांना नक्कीच सकारात्मक ऊर्जा मिळाली असेल. फडणवीस आणि पवार यांच्यात काय चर्चा झाली असेल याच्या ‘पुड्या’ आणखी दोनेक दिवस सुटतील. पण जे पवारांना ओळखतात ते नक्कीच सांगू शकतील की, पवारांनी विरोधी पक्षनेत्यांची शाळाच घेतली असेल. विरोधी पक्षाने संकटकाळात कसे जबाबदारीने वागायला हवे याचे चोख मार्गदर्शन पवार यांनी विद्यमान विरोधी पक्षनेत्यांना केले असावे. सध्या महाराष्ट्रातला विरोधी पक्ष बेभान झाला आहे व विरोधासाठी विरोध हेच त्यांचे ध्येय ठरले आहे. सध्याची स्थिती एकमेकांना सहकार्य करून राज्याला गती देण्याची आहे, पण विरोधी पक्षाने सरकारशी असहकार पुकारला आहे.
आपल्या राज्याला विरोधी पक्षाची व विरोधी पक्षनेत्यांची उत्तम परंपरा आहे. त्यातील एक विरोधी पक्षनेते शरद पवारसुद्धा होते. राज्य सरकारची कोंडी करून राज्याच्या हिताची कामे मार्गी लावणे हे विरोधी पक्षाचे मुख्य काम आहे. सरकार कोठे चुकत असेल तर आवाज चढवून बोलण्याचा अधिकारही विरोधी पक्षनेत्यांना आहेच. फडणवीस यांनी उत्तम विरोधी पक्षनेत्यांची परंपरा पुढे चालवली तर राजकारणातील त्यांचा नावलौकिक वाढेल.
सध्या विरोधी पक्षाचे भांडण महाराष्ट्राशी सुरू आहे ते राज्याच्या हिताचे नाही. एक बहुमताचे स्थिर सरकार असताना व सरकार कोरोना, वादळ, आर्थिक मंदी यांसारख्या संकटांशी सामना करीत असताना रोज सरकार पाडण्याचे स्वप्न बघणे कितपत योग्य आहे? महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पाडायचे या एकमेव ध्येयापोटी विरोधी पक्ष काम करीत आहे व फडणवीसांचे इतर सहकारी अशी वक्तव्यं रोज करीत आहेत. जी राज्याच्या हिताची नाहीत, असेही संजय राऊत यांनी या अग्रलेखात म्हटले आहे.