इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– आपलं पर्यावरण –
अर्बन हीट
अर्बन हीट, हा अलीकडे प्रचलीत आणि परिचीत होऊ लागलेला शब्द. या शब्दातूनच त्याच्या अर्थाचा बोध व्हावा. जमिनीवरचे गवत, तॄण, झुडपं, जंगल आदींचे नैसर्गिक आवरण बाजूला सारून जेव्हा जाडजूड अशा पेव्हमेंट्सचे आवरण टाकून जमीन झाकण्याचा प्रयत्न होतो, जमिनीवर मोठ मोठ्या इमारती उभ्या राहतात, तेव्हा उष्णता शोषून घेण्याची आणि ती उष्णता स्वत:त जिरवण्याची, धरून ठेवण्याची क्षमता असलेल्या या घटकांमुळे वातावरण थंड करण्यासाठी अधिक क्षमता लागते. हवेच्या प्रदूषणाची पातळी वाढते आणि मानव व अन्य जिवीत घटकांचा विचार केला तर उष्णतेशी संबंधित आजार, त्यामुळे होणारे नुकसान, मॄत्यू असे परिणाम त्यासंदर्भात समोर येतात.
आजुबाजूला असलेल्या ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील वाढते तापमान हेच अर्बन हीट आहे. या दोन भागातील तापमानातील भेदांनी अनेक बाबी स्पष्ट केल्या आहेत. सूर्य प्रकाश तर ग्रामीण व शहरी भागात सारख्याच प्रमाणात असतो. त्याची दाहकताही सर्वदूर समान असते. मग या दोन भागातील उष्णतेच्या प्रमाणात फरक का आढळत असेल? उत्तर स्पष्ट आहे. जमिनीची धूप थांबविण्यासाठी जे उपाय निसर्गाने स्वतःसाठी योजले आहेत, त्याचे तीन तेरा वाजवून शहरी भागातील लोकांनी झाडांची लागवड पूर्णपणे दुर्लक्षून, उलट उष्णता धरून ठेवणारी, वाढवणारी व्यवस्था उभारली जाते आहे. मुळांच्या माध्यमातून जमिनीतील पाणी शोषून बाष्पीभवनाच्या प्रक्रियेद्वारे वातावरण थंड राखण्याचे काम झाडं, गवत, तॄण, झुडपं करीत असतात.
नैसर्गिक एअरकन्डीशनिंग- ट्रान्स्पिरेशनची नेमकी तीच प्रक्रिया शहरी भागात आता लुप्त झाली आहे. साधी गोष्ट आहे. भर उन्हात, सिमेंट -रेतीच्या पेव्हमेंट्वरून अनवाणी फिरून बघा आणि हाच प्रयोग हिरव्यागार गवतावर करून बघा. फरक आणि गरज नेमकी कशाची आहे, हे त्याच क्षणी लक्षात येईल. असे गवताचे आच्छादन असलेल्या जागा शहरात दिसतात कुठे आताशा? तिथे तर जमिनीवर उंच उंच इमारती आहेत. रस्ते आहेत. सिमेंट, विटा, काच, लोखंड, पेव्हमेंट्स…यांचाच बोलबाला आहे. यातील बव्हतांश वस्तू उष्णता, सूर्यप्रकाश शोषून घेण्याची क्षमता राखतात. त्याचा स्वाभाविक परिणाम तापमान वाढीत होतो. अलीकडे यासंदर्भातील उपाय म्हणून रस्त्यांवर, उघड्या जागांवर ग्रे रंगाचे कोटींग देण्याचा प्रयोग काही देशांमध्ये सुरू झाला आहे. या उपायाने काही फरक निश्चितच पडेल. पण गवतामुळे येणारा गारवा त्यातून कसा येणार?
नवयुगात उंच इमारतींना पर्याय नसला तरी अशा इमारतींवरील रुफ टाॅप गार्डन मात्र बरीच किमया घडवू शकतात. लाॅस एंजलिस, कॅलिफोर्निया आदी शहरांमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, वातावरण थंड करण्यासाठी लागणाऱ्या एनर्जीत घट करण्यात रूफ टाॅप गार्डनचे योगदान अधोरेखित झाले आहे. नासाने अंतराळात धाडलेले लॅण्डसॅट, सुओमी एनपीपी या सारखे सॅटेलाईट्स पॄथ्वीवरील झाडांचे आच्छादन आणि तापमानाचे सतत निरीक्षण करीत असतात. त्यावरून काही उपाय केले जाताहेत. त्याद्वारे क्लायमेट चेंज, अर्बन हीट, ग्रीन हाऊस गॅसेस, इको सिस्टीमच्या समस्यांवर तोडगे काढण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
भारताचा विचार केला तर, अलीकडे विविध भारतीय शहरांमध्ये वाढत्या तापमानाची नोंद झाली आहे. सिमेंट काॅंक्रीटचा वापर करीत तयार होत असलेल्या गगनचुंबी इमारती, रस्ते, पायाभूत सुविधा, अन्य इन्फ्रास्ट्रक्चर या बाबींचा हा परिणाम मानला जातो. या परिस्थितीत अधिकाधिक झाडांची लागवड करणे, जमिनीवर गवत, तॄण, झुडपांचे नैसर्गिक आवरण कायम ठेवणे, असे उपाय यासंदर्भात महत्त्वाचे ठरतात. अधिकाधिक मोकळी जागा, हवा खेळती राहील अशी व्यवस्था, हे देखील काही उपाय आहेत. पण भारतात मेट्रो सिटीज् सोबतच मध्यम व छोट्या आकाराच्या शहरांमध्ये देखील ही समस्या भेडसावते आहे.
जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा, आर्थिक विकासपथावर मार्गक्रमण करणारा असा हा देश. इथे, शहरी भागातील तापमान वाढीचा परिणाम मानवासह प्राणी, झाडं व अन्य जीवीत घटकांवर होत आहे. जलसाठे आकुंचन पावत आहेत. वाढत्या तापमानामुळे पाण्याचे तापमान वाढल्याने त्यातील जीवन सॄष्टीवर, काही जीव-जंतूंच्या प्रजोत्पादन क्षमतेवर देखील त्याचा नकारात्मक परिणाम होतो आहे. उन्हाळ्यात तापमान पन्नास पन्नास डीग्री सेल्सिअस वर चालले आहे. यासंदर्भात वैज्ञानिकांच्या अभ्यासातून समोर आलेले काही निष्कर्ष तर धोक्याची घंटा वाजविणारे ठरताहेत. हवेचा पॅटर्न, ढग आणि धुके तयार होण्याची प्रक्रिया, वातावरणातील आर्द्रता, पर्जन्यमान अशा साऱ्याच गोष्टी त्यामुळे प्रभावीत होताहेत. गरम हवा अधिक प्रमाणात वर जात राहिल्याने अधिक पाऊस, अधिक-वेगवान वादळं यांची शक्यता बळावली आहे.
विकासाची प्रक्रिया ही तर काळाची गरज आहे. पण, मग त्याच्या दुष्परिणामांचा विचार आणि त्यावरील उपाय हे सुद्धा माणसाचे कर्तव्य ठरते. त्याचाच विचार होण्याची आता गरज आहे….
डॉ. प्रवीण महाजन,
जल अभ्यासक
डॉ. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कार्थी (महाराष्ट्र शासन).
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत `चला जाणूया नदीला` राज्यस्तरीय समिती सदस्य, (महाराष्ट्र शासन).
What is Urban Heat by Pravin Mahajan