मुंबई – ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) पराग अग्रवाल यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्ताने बहुराष्ट्रीय आणि दिग्गज कंपन्यांच्या सीईओंना नक्की किती पगार मिळतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळेच त्याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.
पराग अग्रवाल यांना वार्षिक १ मिलियन डॉलर (जवळपास ७.४९ कोटी रुपये) पगार मिळणार आहे. त्याशिवाय पराग अग्रवाल यांना भत्ते आणि बोनसही दिले जाणार आहेत. सीईओ होण्यापूर्वी पराग अग्रवाल ट्विटरमध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) होते. ते कंपनीच्या तांत्रिक धोरणाचे काम पाहात होते.
कंपनीचे शेअर्सही
ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांना बोनस प्लॅन मिळाला आहे. अग्रवाल यांना कंपनीकडून वार्षिक पगाराच्या १५० टक्के टार्गेट बोनस मिळणार आहे. डिसेंबर २०२१ च्या कार्यालयीन मंडळाकडून जारी पत्रानुसार, अग्रवाल यांना जवळपास ९४ कोटींचे कंपनी शेअर दिले जातील. अग्रवाल यांना १६ वेळा कंपनीचे शेअर मिळणार आहेत. ट्विटरच्या रेग्युलेटरी फायलिंगद्वारे याचा खुलासा झाला आहे.
पिचाई यांच्यापेक्षा कमी पगार
गुगल आणि अल्फाबेट या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्या पगाराशी पराग अग्रवाल यांच्या पगाराची तुलना केली तर, पराह अग्रवाल यांचा पगार दहा पटीने कमी आहे. सुंदर पिचाई यांचा पगार जवळपास १० मिलियन डॉलर (१५ कोटी रुपये) वार्षिक आहे.
इतर भारतीय सीईओंचा पगार
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांचा पगार भारतीय सीईओंमध्ये सर्वाधिक आहे. नडेला यांना वार्षिक ५० मिलियन डॉलर (३७४ कोटी रुपये) पगार मिळतो. अॅडॉबचे सीईओ शांतनू नारायण यांचा पगार १ मिलियन डॉलर (७.४९ कोटी रुपये) आहे. आबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा यांचा पगार वार्षिक १.५ मिलियन डॉलर (११.२३ कोटी रुपये) आहे. रेवती अद्वैती यांना २०१९ रोजी फ्लेक्सचे सीईओ बनविण्यात आले होते. त्यांचा वार्षिक पगार $2,599,267 (२० कोटी रुपये) आहे.