इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – योगी आदित्यनाथ की अजयसिंह बिष्ट अशा वेगवेगळ्या नावांचा वापर होत असल्याने उत्तर प्रदेशातील नागरिकांच्या मनात संभ्रम तयार होतो. यामुळे कोर्टानेच आदेश देऊन याबाबत सुसुत्रता आणावी, अशी याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यास अलाहाबाद हायकोर्टाने एक लाख रूपयांचा दंड ठोठावला.
दिल्ली येथील याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या या याचिकेवर मुख्य न्यायमुर्ती राजेश बिंदल आणि न्यायमुर्ती पीयूष अग्रवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. योगी आदित्यनाथ यांच्या अनेक नावांचा वापर केला जातो, असा आरोप याचिककर्त्याने केला होता. मात्र, सरकारी पक्षाने याचिकाकर्त्याच्या हेतूवरच संशय घेतला. ही याचिका फक्त सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी दाखल करण्यात आल्याचे सरकारी पक्षाने स्पष्ट केले. विशेष म्हणजे याचिकाकर्त्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच प्रतिवादी केले. अपर महाधिवक्ता मनीष गोयल यांनी मांडलेली ही बाजू खंडपीठाने योग्य ठरवली. तसेच खंडपीठाने याचिकाकर्त्यास एक लाख रूपयांचा दंड ठोठवला. सहा आठवड्यात जमा होणारी ही रकम प्रयागराज येथील जवाहरलाल नेहरू रोडवरील विकलांग आश्रमास देण्यात येणार आहे.