इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेकांना कुत्रा पाळण्याचा छंद असतो. कुत्र्याच्या त्रासामुळे किंवा तो कुणाला चावल्यास कुत्र्याच्या मालकाला दंड होऊ शकतो, हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यातच सध्या पिटबुल नावाचे कुत्रे सध्या विशेष चर्चेत आहेत. ते आक्रमक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या जातीच्या कुत्र्यांविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.
भटक्या कुत्र्यांप्रमाणे पाळीव कुत्र्यांसाठीही ठोस नियमावली ‘अॅनिमल वेलफेअर बोर्डा’ने स्पष्ट केली आहे. कुत्री भुंकणारच. मात्र, ती भुंकून भुंकून हैराण करत असतील, तर त्यांचे भुंकणे नियंत्रित करण्याची व त्यामागील कारणे शोधण्याची जबाबदारी मालकाची राहील! रात्रीच्या वेळी कुत्रा भुंकणार नाही, याची काळजीही मालकाने घ्यायला हवी. घरात कुत्रा पाळण्याचा अधिकार कुणालाही आहेच. मात्र, त्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
सध्या आपल्याला कुत्र्याने माणसांवर केलेला हल्ला, इतर लहान प्राण्याला केलेली इजा , तर कधी पाळीव कुत्र्याने घरातल्या व्यक्तीवर, शेजारच्यावर हल्ला केल्याचे व्हिडिओ देखील बघायला मिळतात. कुत्र्यावरून शेजाऱ्यांमध्ये भांडण होऊन वाद टोकाला गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. पण पाळीव कुत्र्यासाठी सरकारने काही नियम बनवले आहे. जर तुम्ही किंवा तुमचे शेजारी कुत्रा पाळत असाल तर हे नियम तुम्हाला पाळणे अनिवार्य आहेत.
विशेषतः मुंबईत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढता असून, गेल्या पाच वर्षांत भटके कुत्रे चावल्यामुळे तब्बल ६३ जणांना जीव गमवावा लागला. दर महिन्याला साधारण एका मुंबईकराचा कुत्रा चावल्याने मृत्यू होतो. दरवर्षी किमान ३५ हजार मुंबईकरांना कुत्रे चावतात. गेल्या वर्षी मुंबईत सुमारे ६७,७८० जणांना कुत्रा चावल्याच्या घटना घडल्या, तर ठाण्यात ही संख्या सुमारे ११, ४४० आहे. कुत्रा चावल्यामुळे देशात दरवर्षी सुमारे २९ हजार नागरिकांचा रेबिजने मृत्यू होतो.
नवी दिल्ली नजिक गाझियाबाद येथील एका उद्यानात पिटबुल जातीच्या कुत्र्याने एका १० वर्षीय मुलावर हल्ला केला होता. संबंधित कुत्र्याने मालकाच्या हातातून स्वत:ची सुटका करून घेत, या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित मुलगा गंभीर जखमी झाला होता. गेल्या महिन्यात गाझियाबाद येथे सहा वर्षांच्या चिमुरडीला तसेच गुडगावमध्ये एका महिलेला पिटबुल जातीच्या कुत्र्याने चावा घेतला होता. तर जुलै महिन्यात लखनऊमध्ये पिटबुल जातीच्या कुत्र्याने एका वृद्ध महिलेवर हल्ला करत तिला जखमी केलं होतं.
गाझियाबाद व गुडगावमधील घटनांमध्ये संबंधित कुत्र्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षेचा उल्लेख आहे. कुत्र्याच्या मालकांनी आपल्या पाळीव कुत्र्याची ताकद लक्षात ठेवली पाहिजे. जर कुत्र्यामुळे नागरिकांना धोका निर्माण होत असेल, तर त्या कुत्र्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मालकाने त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास याला कायद्याच्यादृष्टीने कुत्र्याचा मालक जबाबदार आहे.
प्राणी हक्काचं संरक्षण करणाऱ्या पेटा संस्थेने या वर्षी जुलैमध्ये मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. संबंधित पत्रात त्यांनी पिटबुल हे धोकादायक जातीचं कुत्रं असल्याचं म्हटलं होतं. त्याच्या आक्रमक स्वभावामुळे लोकांनी पिटबुलसारखे कुत्रे पाळायला सुरुवात केल्याचंही पत्रात म्हटलं होतं. भटक्या आणि जखमी कुत्र्यांची काळजी घेणार्या ‘फ्रेंडिकोज’ या स्वयंसेवी संस्थेसोबत काम करणार्या एका महिलेने सांगितलं की, पिटबुल कुत्र्याची पैदास बुलडॉग आणि टेरियर्सपासून करण्यात आली आहे. त्यामुळे पिटबुल कुत्र्याकडे बुलडॉग आणि टेरियरप्रमाणे ताकद आहे.
पाळीव प्राण्यांचे एका अभ्यासक यांनी सांगितलं की, हरियाणाच्या काही भागांमध्ये होणाऱ्या कुत्र्यांच्या लढाईत पिटबुल्सचा वापर केला जातो. पिटबुल कुत्रा शक्तीशाली असल्याचं नागरिकांना वाटतं. त्यामुळे आता या कुत्र्याचं भारतात स्थानिक पातळीवर प्रजनन घडवून आणलं जात आहे. पण भारतात पिटबुल्सची होणारी पैदास फारशी चांगली नसल्याचं मत यांनी व्यक्त केलं आहे.
प्रत्येक कुत्र्याची जात वेगळी असते. सध्याच्या काळात नागरिकांना पिटबुल कुत्रा पाळण्याचं वेड लागलं आहे. घरात पिटबुलसारखा कुत्रा पाळणं कुत्र्यांच्या मालकांना प्रतिष्ठेचं वाटू लागलं आहे. हा कुत्रा ताकदवान आणि तंदुरुस्त असल्याने काही जण या कुत्र्याला विकत घेतात. मात्र, या कुत्र्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष केलं जातं. अशा कुत्र्यांना बहुतेक जण बांधून ठेवतात. पण पिटबुल हे उच्च उर्जा असलेलं कुत्रं आहे. पण मालकांच्या अज्ञानामुळे पिटबुल कुत्र्याची देखभाल योग्यप्रकारे होत नाही. त्यांना बांधून ठेवल्याने त्यांना व्यायाम मिळत नाही. परिणामी हे कुत्रे घातक किंवा आक्रमक होण्याची शक्यता असते, त्यामुळे कुत्र्याच्या मालकांनी या संदर्भात काळजी घेणे आवश्यक आहे, मग कोणत्याही प्रजातीचा असो.
What is Pitbull Dog Specialty Dangerous Aggression
Pet Animals