विशेष प्रतिनिधी, नाशिक
केवळ राज्य नाही तर देशभरात चर्चिले जात असलेले ऑपरेशन हॉस्पिटल हे मिशन आहे तरी काय असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. त्याचीच माहिती आपण आता घेणार आहोत.
असे आहे ऑपरेशन हॉस्पिटल
कोरोनाचे संकट सुरू झाले आणि सर्वसामान्यांना आरोग्योपचारासाठी खासगी किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागत आहे. मात्र, हॉस्पिटलकडून रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड आर्थिक लूट खासगी हॉस्पिटलमध्ये केली जात आहे. याच मनमानी कारभाराला वाचा फोडण्यासाठी ऑपरेशन हॉस्पिटल या अभियानाचा जन्म झाल्याचे आम आदमी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी म्हटले आहे.
ही आहेत कारणे
भावे सांगतात की, हॉस्पिटल जे बिल देते त्यात पीपीई कीटचे हजारो रुपये उकळले जातात. एकच पीपीई कीट घालून दिवसभर अनेक पेशंटला आरोग्यसेवा दिली जाते आणि सर्वच पेशंटकडून पीपीई कीटच्या नावाने पैसे वसूल होतात. हे फक्त एक उदाहरण आहे असे कितीतरी प्रकार आहेत ज्याद्वारे दिवसाढवळ्या आणि बिनदिक्कतपणे आर्थिक लूट केली जाते. प्रशासकीय यंत्रणा आणि सरकार हे याबाबत काहीच करत नाहीत. म्हणूनच ऑपरेशन हॉस्पिटल हे अनेकांना दिलासा देत आहे, असे भावे म्हणाले.
पोलिस स्टेशन बाहेर आलेले ते कोण होते
वोक्हार्ट हॉस्पिटलमधील आंदोलनानंतर भावे आणि त्यांच्या समर्थकांना मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. या सर्व प्रकरणात भावे यांना लक्ष्य करण्याचा प्रकार सुरू होता. अनेक तास हे नाट्य सुरू होते. मात्र, भावे यांच्या समर्थनार्थ पोलिस स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जमाव असल्याचे पहायला मिळाले. यासंदर्भात भावे यांनी स्पष्ट केले आहे की, ऑपरेशन हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ झालेलेच पोलिस स्टेशनबाहेर जमले होते. हे अभियान किती यशस्वी झाले आहे त्याचेच ते द्योतक आहे, असेही भावे यांनी म्हटले आहे.
आजवर किती जणांना फायदा
ऑपरेशन हॉस्पिटल हे अत्यंत लोकप्रिय झाले कारण त्याचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य व्यक्ती आहे. त्याच्या समस्या यातून सूटत आहेत, त्यांना दिलासा मिळत आहे. आतापर्यंत १६ ते १७ मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना परत मिळवून देणे या अभियानामुळेच शक्य झाले आहे. तसेच, केवळ नाशिकमध्ये हे ऑपरेशन राबविले गेले नाही तर ग्रामीण भागात, अन्य शहरात, जिल्ह्यात आणि परराज्यातही ते आता राबविले जात आहे. म्हणजे विस्तार वाढतो आहे. त्यामुळे ३०० ते ४०० जणांना त्याचा लाभ झाला आहे. प्रत्यक्ष ४ ते ५ कोटी रुपये आणि अप्रत्यक्षरित्या ८ ते १० कोटी रुपये सर्वसामान्यांचे वाचले आहेत, असा दावा भावे यांनी केला आहे.
या क्रमांकावर संपर्क साधा
ऑपरेशन हॉस्पिटलमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा हॉस्पिटलकडून होणाऱ्या आर्थिक लुटीची तक्रार करण्यासाठी ९२२५७९२२५५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन भावे यांनी केले आहे.