पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑनलाइन शिक्षण ही काळाची गरज झाली आहे. हे शिक्षण सहजसोपे व्हावे, यासाठी विविध संशोधने केली जात आहे. असेच एक संशोधन आता समोर आले असून, हे जगातील पहिले 3D इमर्सिव्ह व्हर्च्युअल लर्निंग प्लॅटफॉर्म असणार आहे. जगातील कोठूनही विद्यार्थ्यांना अॅनिमेटेड अवतारांद्वारे इतर विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांशी संवाद साधण्याची परवानगी यामार्फत मिळेल.
कोविड – १९ महामारीच्या काळात ऑनलाइन शिक्षणाला गती मिळाली. सध्याच्या युगात तर ऑनलाइन शिक्षण हे अगदी सामान्य बाब झाली आहे. अशा स्थितीत ऑनलाइन शिक्षण क्षेत्रात अनेक प्रकारचे नवनवीन शोध पाहायला मिळत आहेत. ट्विटर इंडियाचे माजी प्रमुख मनीष माहेश्वरी यांनी अशाच एका संशोधनावर प्रकाश टाकला आहे. माहेश्वरी स्टार्टअप ‘इन्व्हेक्ट मेटाव्हर्सिटी’ हा स्टार्टअप ते सुरू करणार आहेत. जगातील ७०हून अधिक आघाडीचे उद्योजक आणि युनिकॉर्नचे संस्थापक यामध्ये गुंतवणूक करणार आहेत. या उद्योजकांनी ३.३ करोड डॉलर मुल्यांकनात गुंतवणूक केली आहे. पण हे मेटाव्हर्सिटी म्हणजे नेमकं आहे काय, हे आधी जाणून घेऊया.
इन्व्हेक्ट मेटाव्हर्सिटी हे जगातील पहिले 3D इमर्सिव्ह व्हर्च्युअल लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. हे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील विद्यार्थ्यांना अॅनिमेटेड अवतारांद्वारे इतर विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांशी संवाद साधण्याची सोय उपलब्ध करुन देते. विद्यार्थ्यांना आभासी जगात एकत्र फिरण्याची परवानगी देऊन त्यांना एकमेकांकडून शिकण्याची संधीही यातून मिळणार आहे. तसेच ऑनलाइन शिक्षणाला एक कम्युनिटी टच यामार्फत मिळणार आहे जो आतापर्यंत कोणत्याही प्लॅटफॉर्मवर उपस्थित नव्हते. सोप्या भाषेत सांगायचे तर हे एक आभासी विद्यापीठ असणार आहे. जे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने काम करेल. या विद्यापीठातून लोकांना व्हर्च्युअल पदवीही घेता येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, या पदव्यांमुळे तुम्हाला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात नोकरी मिळू शकेल. इन्व्हेक्ट मेटाव्हर्सिटीचे संस्थापक आणि सीईओ मनीष माहेश्वरी यांच्या मते, सर्वांना परवडणाऱ्या दरात शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.