मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
राज्यसभेची निवडणूक येत्या १० जूनला होत आहे. महाराष्ट्रातील ६ जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. यादरम्यान सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीमधील शिवसेना जोरदार प्रयत्न करत आहे. परंतु अपक्ष आमदारांचा घोडेबाजार होत असल्याचा आरोप शिवेसेनेचे नेते करत आहेत. या सर्व राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजार म्हणजे नेमके काय? राजकारणात याचे काय अर्थ असतो? आणि राजकारणात या शब्दाचा वापर नेमका कधी सुरू झाला? हे आपण जाणून घेऊ या.
भारतीय राजकारणात या शब्दाचा अर्थ आमदार आणि खासदारांना दिलेल्या प्रलोभनाशी जोडला जातो. जर एखाद्या फायद्यासाठी किंवा एखादे सरकार अस्थिर करण्यासाठी खासदार आणि आमदार विरोधी गोटात जातात, तेव्हा त्याला घोडेबाजार झाला असे म्हणतात.
घोडेबाजार या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे हॉर्स ट्रेडिंग. या शब्दाचा समावेश सर्वप्रथम कॅम्ब्रिज शब्दकोशात करण्यात आला होता. दोन पक्षांमध्ये पडद्यामागे होणाऱ्या चर्चेत दोन्ही पक्षांचा फायदा होणे, असा याचा अर्थ देण्यात आला होता. एकूणच काय तर जास्तीत जास्त फायदा आपल्या बाजूने वळविण्यासाठी दोन पक्षांमध्ये झालेला अलिखित करार होय. त्यानंतर दोन्ही पक्ष एका निष्कर्षापर्यंत पोहोचतात.
सन १८२० च्या आसपास घोड्यांच्या विक्रीसाठी या शब्दाचा उपयोग केला जात होता. पैसा आणि परस्पर फायदे लबाडीने मिळविण्यासाठी घोड्यांना एका तबेल्यातून दुसरीकडे लपविले जात होते. नंतर पैशांच्या देवाणघेवाणीच्या जोरावर करार केला जात होता. म्हणजेच घोडे व्यापारी आपल्या घोड्यांची खरेदी-विक्री करण्यासाठी ज्या काही वेगळ्या पद्धती वापरत होते, त्याला घोडेबाजार असे म्हटले जायचे. त्या काळी अशीच साधारण व्यापाराची पद्धत होती.
नंतर राजकारणात या शब्दाचा वापर करण्यास सुरुवात झाली. जेव्हा एखादा पक्ष विरोधी पक्षामधील नेत्यांना त्यांच्या पक्षात बोलावण्यासाठी वेगवेगळी प्रलोभने दाखवतात. अशा प्रकारच्या खरेदी-विक्रीच्या प्रकाराला राजकारणात घोडेबाजार असे संबोधले जाते. एखाद्या करारापर्यंत पोहोचण्यासाठी दोन जणांमध्ये झालेली अप्रामाणिक चर्चा, असा अर्थ मॅकमिलन इंग्रजी शब्दकोशात देण्यात आला आहे.
भारतीय राजकारणात घोडेबाजाराची १९६७ सालापासून सुरुवात झाली. ऑक्टोबर १९६७ साली हरियाणा येथील एक आमदार हया लाल यांनी १५ दिवसांच्या आत तीन वेळा पक्ष बदलून हा शब्द राष्ट्रीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणला होता. त्यादरम्यान देशात आयाराम गयारामचे राजकारण खूपच प्रचलित होते. १९८५ मध्ये झालेल्या ५२ व्या राज्यघटना दुरुस्तीत संधीसाधूपणाची ही प्रथा बंद करून, १० वी अनुसूची जोडण्यात आली.