मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने ई-रूपी प्रीपेड डिजिटल व्हाउचरची मर्यादा दहा हजारांवरून एक लाखांपर्यंत केली आहे. तसेच ते लाभार्थ्यांना विविध सरकारी योजनांच्या डिजिटल वितरणाच्या सुविधेसाठी अनेक वेळा वापरण्याची परवानगी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी जुलैमध्ये ई-रूपी ऑफर दिली होती. व्हाउचरवर आधारित प्रणाली देशात डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार आहे, असे त्यांनी म्हटले होते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एपीसीआय) तर्फे विकसित करण्यात आलेल्या ई-रूपी प्रीपेड डिजिटल व्हाउचर ग्राहकांसाठी ऑगस्ट २०२१ मध्ये सादर करण्यात आले होते. तेव्हा या सुविधेचा वापर फक्त एका विशेष व्यक्ती आणि विशेष उद्देशासाठी दहा हजार रुपयांच्या कॅशलेस व्हाउचरच्या रूपात जारी करण्यात आले होते.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने अर्थव्यवस्थेला बळकट आधार देण्याच्या उद्देशाने रेपो रेटमध्ये सलग दहाव्यांदा बदल केला नाही. तो चार टक्क्याच्या खालच्या स्तरावर कायम ठेवण्यात आला आहे. धोरणात्मक दर जैसे थे ठेवण्याचा अर्थ असा आहे की, बँकेच्या कर्जाचे मासिक हप्त्यामध्ये म्हणजेच ईएमआयमध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, की विविध राज्य सरकारे, केंद्र सरकारचे मंत्रालये आणि विविध विभागांच्या प्रकरणांमध्ये सक्रिय विचार करण्यात येत आहे. तसेच आरबीआयने महागाईचा उच्च दराच्या पार्श्वभूमीवर धोरणामध्ये उदारवादी भूमिका कायम ठेवली आहे.
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चलनविषयक धोरणाचा आढावा घेताना माहिती दिली आहे की, चलनविषयक धोरण ठरवणाऱ्या समिती म्हणजेच एमपीसीने रेपो दर चार टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रिव्हर्स रेपो दराला ३.३५ टक्के कायम ठेवला आहे. व्यापारी बँकांच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आरबीआय कर्ज वितरित करते. याचाला रेपो दर असे म्हणतात. तर रिव्हर्स रेपो दरांतर्गत बँकांना आपला पैसा आरबीआयला दिल्यास व्याज मिळते. आगामी आर्थिक वर्षासाठी आरबीआयने सकल देशांतर्गत उत्पादनाचा दर (जीडीपी) ७.८ टक्के राहण्याची शक्यता आहे. त्याशिवाय चालू आर्थिक वर्षासाठी आधी वर्तवलेल्या ९.५ टक्के अंदाज घटवून ९.२ टक्के करण्यात आला आहे. महामारीमुळे उत्पन्नाची अनिश्चितता आणि जागतिक स्तरावर वस्तू महाग झाल्यामुळे आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.