मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारतीयांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी आता आभासी चलन म्हणजेच डिजिटल करन्सीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. याबाबत केंद्र सरकारतर्फे नव्याने घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय भाषणात डिजिटल करन्सीसंबंधित ही मोठी घोषणा केली आहे.
अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितल्याप्रमाणे रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या वतीने डिजिटल रुपीची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. डिजिटल रुपी ब्लॉकचेनसोबतच इतर तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल चलन असेल. तसे पाहायला गेले तर, डिजिटल चलनाची संकल्पना भारतीयांसाठी नवीन नाहीय. बिटकॉईनसोबतच इतर अनेक आभासी (व्हर्चुअल) चलनाची खरेदी सुरू आहे. मात्रा डिजिटल रुपी हे पहिले आभासी चलन असेल, जे आरबीआय जारी करणार आहे आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) नियंत्रित करेल.
महत्त्वाचे म्हणजे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर हा केवळ डिजिटल चलनापर्यंत मर्यादित नसेल. त्याचा वापर कोणत्याही वस्तूला डिजिटल बनवून त्याची संपूर्ण माहिती ठेवण्यासाठीदेखील केला जातो. या तंत्रज्ञानावर आधारित टर्म एनएफटी (NFT) सध्या खूप चर्चेत आहे. एनएफटी बिटकॉईन किंवा इतर क्रिप्टो करन्सीप्रमाणेच एक क्रिप्टो टोकन असते. एनएफटी हा कला, संगीत, चित्रपट, खेळ यांचा डिजिटल संग्रह असतो. ज्याच्या मोबदल्यात तुम्हाला डिजिटल टोकन दिले जातात, ज्यांना एनएफटी म्हणजेच नॉन फंजिबल टोकन असेही म्हटले जाते. सद्यस्थितीत एनएफटी हे कमाईचे मोठे माध्यम बनले आहे.
शब्दशः अर्थ घेतल्यास ब्लॉकचेन तंत्रज्ञान ब्लॉक व चेन या दोन शब्दांच्या एकत्रिकरणातून बनला आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानात डेटा ब्लॉक असतात. या ब्लॉक्समध्ये करन्सीला (चलन) डिजिटल स्वरुपात ठेवले जाते. हे ब्लॉक एकमेकांशी जोडलेले असतात. अशाप्रकारे डेटाची एक मोठी लांब साखळी (चेन) तयार होते. जिला ब्लॉकचेन तंत्रज्ञान म्हणतात. डेटाब्लॉकमध्ये देवघेवाण संदर्भात माहिती असते. प्रत्येक ब्लॉक एंप्रिक्शनमार्फत सुरक्षित होतात. कारण की, हे ब्लॉक एकदुसऱ्यांशी इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले असतात.
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वर्ष १९९१ मध्ये स्टुअर्ट हबर व डब्ल्यू स्कॉट स्टोर्नेटो यांनी उल्लेख केला होता. या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश हा डिजिटल डॉक्युमेंट्सना (कागदपत्रे) टाइमस्टँम करणे होता. ज्यामुळे डिजिटल चलनामध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड केली होऊ नये, हादेखील उद्देश आहे. त्यानंतर वर्ष २००९ मध्ये सतोशी नाकामोतो यांनी ब्लॉकचेनचा वापर करून बिटकॉईनचे संशोधन केले.