लखनऊ (उत्तर प्रदेश) – सध्याच्या आधुनिक काळात मात्र योग्य शिक्षणाबरोबरच रंग, रूप, उंची याशिवाय अन्य गोष्टींचा देखील वधू-वरांचे विवाह जमवताना विचार केला जातो. कोणत्याही वराला नेहमी ‘सुंदर’ बायको हवी असते. तसेच वधूला देखील ‘देखणा’च नवरा हवा असतो. त्यामुळे आजच्या काळातील मुली सुद्धा अगदी लग्नात देखील वराला म्हणजे नवऱ्या मुलाला नाकारू शकतात, असे काही वेळा घडते. अशीच एक घटना घडली बरेली जिल्ह्यात घडली. पाहुया नक्की काय झाले ते?
कासगंजमधील ढोलना परिसरातील कोतवाली भागात गादीपाचाई गावातून एक लग्नाची मिरवणूक बरेलीच्या उजनी भागात आली होती. या मिरवणुकी दरम्यान वधूने वराकडे पाहिले तेव्हा त्याचा एक डोळा थोडा लहान आहे असे तिला दिसले. झाले! मग येथेच गोष्टी आणखी बिघडू लागल्या. वधूने फेरे घेण्यास व विवाह विधीस नकार दिला. वधू स्टेजवरुन खाली उतरली व सरळ तिच्या खोलीत जाऊन बसली. तसेच तिने दागिने व उंची वस्त्रही काढून साधे कपडे परिधान केले. नेमके काय झाले, हे वऱ्हाडी मंडळींना कळेचना. त्याचवेळी लग्नमंडपात सर्वत्र गोंधळ उडाला.
वधू नाराज झाल्याचे वर पक्षाच्या मंडळीला कळाले, तेव्हा ते समजूत काढू लागले. पण सर्वांची निराशा झाली. वर देखील तेथे आला, पण वराचा एक डोळा छोटा पाहून वधूचा पारा आणखी चढला. तिने लग्न करण्यास नकार दिला.
नातेवाईकांकडून दिवसभर तडजोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही नातेवाईकांनी वधूला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण वधू तिच्या म्हणण्यावर ठाम राहिली. अखेर दोन्हीकडील पक्षांनी आर्थिक व्यवहाराचा हिशेब एकमेकांना दिला, त्यानंतर वराची मिरवणूक रिकाम्या हाती गावी परत गेली.