विशेष प्रतिनिधी, मुंबई
जगातील श्रीमंत व्यक्तींच्या प्रत्येक हालचालीवर बरेच काही अवलंबून असते. विशेषतः उद्योग क्षेत्रातील श्रीमंत असतील तर त्यांच्या एखाद्या छोट्याशा निर्णयाने जगभरातील शेअर मार्केटवर मोठा परिणाम होतो. जगातील सर्वांत श्रीमंत म्हणून नोंद झालेल्या एलन मस्कच्या एका ट्वीटने असाच धुमाकूळ घातला.
टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी एक ब्रेक–अपचे ट्वीट केल्यामुळे जगभरातील क्रिप्टोकरंसी बिटकॉईनच्या किंमती सात टक्क्यांनी घटल्या आणि त्या ३६ हजार २६३ डॉलरवर येऊन पोहोचल्या. ट्वीटरवर त्यांनी ह्रदयाचे चिन्ह असलेला इमोजी आणि ब्रेक–अप दर्शविणारे एक छायाचित्र ट्वीट केले. त्याचवेळी त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिप्टो एक्स्चेंज कॉईनबेसच्या वतीने पोस्ट करण्यात आलेल्या क्रिप्टो डॉगकाईनच्या चित्रावर ‘नाईस‘ असा रिप्लायही दिला. या ट्वीटनंतर बिटकॉईनमध्ये घट आढळून आली आणि आता त्याची किंमत ३६ हजार २०० डॉलरच्या आसपास आली आहे. यापूर्वी मस्क यांनी म्हटले होते की, टेस्ला कंपनी बिटकॉईन विकणार नाही, मात्र त्यांचे ट्वीट मार्केट अस्वस्थ करण्यासाठी पुरेसे होते.
४० टक्क्यांनी घट
चीनमध्ये नव्याने आलेल्या नियामक छाननीच्या बातम्यांचा विचार करून बिटकॉईन आणि आणखी अनेक क्रिप्टोकरंसी गेल्या वेळच्या घाट्यातून सावरू शकलेले नाहीत. फेब्रुवारीमध्ये १.५ अरब अमेरिकन डॉलरच्या बिटकॉईनच्या खरेदीच्या घोषणेनंतर टेस्लाचा स्टॉक आता एक तृतियांश घटला आहे. बिटकॉईन एप्रिलच्या ६४ हजार ८९५ डॉलरच्या स्टॉकवरून ४० टक्क्यांनी खाली आला आहे.