सिन्नर – लोकप्रतिनिधी जागृत असेल तर त्याचा फायदा फक्त त्याच्या मतदार संघापुरताच होतो, असे नव्हे तर त्याचा फायदा राज्यातील जनतेलाही होत असतो. मंगळवार पासून मुंबईत ठाण मांडून बसलेल्या आ. कोकाटेंनी सरकारला असा काही निर्णय घेण्यास भाग पाडला की, त्या निर्णयाला राज्यात आता ‘कोकाटे पॅटर्न’ या नावानेच ओळखले जाणार असल्याचे राज्यातील अनेक आमदारांनी मुंबईत पत्रकारांना सांगीतले. सिन्नर तालुक्यातील शेतक-यांची समस्या दुर करतांनाच त्याचा फायदा बारा जिल्ह्यातील ३९२ गावांना झाल्याने शेतक-यांच्या अनेक पिढ्या हा निर्णय कायमस्वरूपी लक्षात ठेवतील.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी प्रस्तावित असलेल्या संरक्षक भिंतीमुळे शेतकऱ्यांची शेतातील वहिवाट बंद होणार होती. शेतकऱ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांना दळणवळणासाठी सर्व्हिस रोड बांधावा व त्यासाठी दहा फुटांची जागा सोडून संरक्षक भिंत आतमध्ये घेण्यात यावी यासाठी आ. माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. आ. कोकाटे यांनी शासनास धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडल्याने ७२० किमीच्या या द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजू मिळून सुमारे १४४० किमीचा सर्व्हिस रोड होणार आहे. त्याचा फायदा राज्यातील बारा जिल्ह्यातील २६ तालुक्यातील ३९२ गावांतील शेतकऱ्यांना होणार आहे.
युती शासनाच्या काळात समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित करण्यात येऊन त्याचे कामही सुरू झाले. शासनाने संपादित केलेली सर्व जमीन या महामार्गासाठी वापरण्याचे निश्चित झाले. ठिकठिकाणी जमिन संपादित झाली. जमिनीचे सपाटीकरण झाले तोपर्यंत शेतकऱ्यांना स्वतःच्या किंवा दुसऱ्यांच्या शेतामध्ये ये-जा करण्यासाठी भविष्यात काही अडचणी येतील, असे वाटले नव्हते. मात्र भराव टाकून रस्ता उंच बनल्यानंतर महामार्गासाठी जमीन जिथपर्यंत संपादित आहे तिथपर्यंत म्हणजे अगदी शेतकऱ्यांच्या बांधाच्या कडेपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी पूर्णतः आरसीसी पद्धतीची सात फूट उंचीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू झाले.मात्र यामुळे शेतकऱ्यांची वहिवाट बंद पडणार होती. शेतकऱ्यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांना भेटून त्यांच्याकडे आपली कैफियत मांडली. ही गोष्ट शेतकऱ्यांवर निश्चितच अन्यायकारक असल्याने आमदार कोकाटे यांनी रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्ण मोपलवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत ही बाब मांडली. शेतकऱ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांसाठी सर्व्हिस रोड बनविण्यासाठी दहा फूट जागा सोडून संरक्षक भिंत बांधावी, अशी आ. कोकाटे यांनी केलेली धोरणात्मक मागणी मोपलवर यांनी तात्काळ मान्य करत समृद्धी महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यानुसार काम करण्याचे आदेश दिले.
अशा पद्धतीने घेतला गेला धोरणात्मक निर्णय
आमदार कोकाटे यांनी संरक्षक भिंत शेतकऱ्यांच्या बांधाजवळ बांधली जात असल्याने शेतात ये-जा करण्यासाठी रस्ताच राहणार नसल्याने त्यांची वहिवाट बंद पडेल. त्यातून अनेक शेतकऱ्यांना जमीन कसता येणार नाही. उपजीविका बंद पडल्यास शेतकरी उद्धवस्त होईल. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा राग अनावर होऊन ते उद्रेक करून ही संरक्षक भिंत पाडून टाकतील. त्यातून महामार्गाचे नुकसान होईलच. मात्र या महामार्गाने ताशी १५० किमी वेगाने वाहने धावत असतांना अचानक मधूनच जनावरे, माणसे व वाहने आडवी गेली तर भीषण असे अपघात शकतात. त्यातून जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दहा फुटांच्या सर्व्हिस रोडसाठी जागा सोडण्यात यावी व संरक्षक भिंत आतमध्ये बांधण्यात यावी, म्हणजे महामार्गाचे व शेतकऱ्यांचेही नुकसान होणार नाही. हे काम फक्त सिन्नर विधानसभा मतदारसंघातली ८५ किमी महामार्गापुरते न करता संपूर्ण राज्यातील ७२० किमी रस्त्यासाठी करण्यात यावे व तसा धोरणात्मक निर्णय घ्यावा, ही मागणी आमदार कोकाटे यांनी लावून धरल्याने या बैठकीत तसा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.
आ. कोकाटेंच्या सततच्या तगाद्याने धोरणात्मक निर्णय
समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले त्यावेळी त्याला उंची देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर माती व मुरूम लागणार आहे, ही जाणीव आ. कोकाटे यांना झाल्याने त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक प्रस्ताव दिला होता. महामार्गाच्या २० किमी परिघातील बंधारे, पाझर तलाव, ओढे व नाले उकरून त्यातील माती व मुरूम महामार्गाच्या भरावात वापरावा. म्हणजे उत्खनन केलेल्या भागात मोठ्या प्रमाणात जलसंचय होऊन या भागाची पाणी पातळी वाढेल. आ. कोकाटे यांच्या या कल्पक मागणीची दखल त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ घेऊन त्यावेळीही ज्या भागातून समृद्धी महामार्ग गेला आहे, राज्यातील अशा सर्व भागासाठी हा धोरणात्मक निर्णय घेतला होता. आता शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी सर्व्हिस रोडसाठी जागा सोडण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या सर्व्हिस रोडचा उपयोग शेतकऱ्यांबरोबर स्थानिक प्रवाशांना होणार आहे. एखादा लोकप्रतिनिधी शासनाकडे फक्त आपल्या मतदारसंघापुरत्या कामाची मागणी करतो. मात्र समृद्धी महामार्गाशी संबंधित जे महत्त्वाचे दोन धोरणात्मक निर्णय झाले ते दोन्ही सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी दूरदृष्टी ठेवून मागणी केल्यामुळे झाले. आ. कोकाटे यांच्या कल्पकतेचे व दूरदृष्टीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बारा जिल्ह्यातील ३९२ गावांना फायदा
समृध्दी महामार्ग मुंबई ते नागपूर दरम्यान बारा जिल्ह्यातून जात आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा व नागपूर या जिल्ह्यातील जवळपास २६ तालुके व ३९२ गावांतील शेतकऱ्यांना या धोरणात्मक निर्णयाचा फायदा होणार असून दहाहून अधिक खासदार व सुमारे २५ हून अधिक आमदार या सर्व भागांचे प्रतिनिधित्व करत असतांना आ. कोकाटे यांनीच शेतकऱ्यांचे प्रश्न शासनापुढे पोटतिडकीने मांडून ते सोडवून घेतल्याने वरील भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघातील जनतेलाही आपसूकच त्याचा फायदा होणार आहे.