मनाली देवरे, नाशिक
सध्या सुरु असलेल्या विवो आयपीएल २०२१ मध्ये कोणता संघ जिंकतोय? कोण पिछाडीवर आहे ? यापेक्षा जास्त चर्चा होते आहे ती कोणत्या संघातले खेळाडू कोवीडग्रस्त झाले आहेत त्याची. कोवीडच्या पार्श्वभुमीवर आयपीएल होणार की नाही ? इथपर्यन्त प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते पंरतु, वैज्ञानिक फॉम्युला वापरुन कोवीडवर मात करणे शक्य आहे अशी भुमिका घेत बीसीसीआयने आयपीएलचा घाट घालण्याचा निर्णय घेतला. बायो–बबलचा वापर करुन कोवीडपासून खेळाडूंची सुरक्षितता साधता येईल आणि प्रेक्षकविरहीत मैदानात सामने खेळून केवळ लाईव्ह प्रसारणातून पैसाही कमविता येईल या हेतूने स्पर्धा सुरु झाली. ५२ दिवसांचा आयपीएल टाईमटेबल आखला गेला.
सुरक्षेच्या हेतुने जिथे मैदान तिथे सामना न खेळवता देशातल्या केवळ अहमदाबाद, बंगलोर, मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या ६ मैदानांची निवड करण्यात आली आणि या सर्व ठिकाणी एकाच वेळी सामने न खेळवता रिस्क आणखी कमी करण्याच्या हेतूने टप्याटप्याने दोन–दोन मैदानांवर सामन्यांच्या आयोजनाचा नकाशा तयार झाला.
ही सर्व काळजी घेवून २९ सामने व्यवस्थित पार पडले परंतु ३० व्या सामन्यात गडबड झालीच आणि कोविडने शिरकाव केल्यानंतर आयपीएलच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली. कोलकाता नाईट रायडर्सचे देान खेळाडू संदीप वॉरीअर्स आणि वरुण चक्रवर्ती हे कोवीड पॉझीटीव्ह असल्याची बातमी सोमवारी आली आणि त्यादिवशी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन संघात होणारा सामना तात्पुरता स्थगित ठेवण्यात आला…! इतक्या मोठया स्पर्धेच्या आयोजनाला भगदाड पाडण्यासाठी ही बातमी पुरेशी होती. कारण, केवळ एका सामन्यापुरता हा प्रश्न नाही. केकेआरच्या पुढच्या सामन्याचे भवितव्य काय ?, जे खेळाडू पॉझीटीव्ह आढळले त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर खेळाडू आणि स्टाफचे काय ? ही बातमी जुनी होत नाही तोच तिकडे चेन्नई सुपर किंग्जच्या ताफयातील सीईओ कासी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि टीमच्या बसची स्वच्छता करणारा एक कर्मचारी कोवीड चाचणीत पॉझीटीव्ह आढळले. एकूणच आयपीएल २०२१ धोक्यात आले आहे हे निश्चीत.
मग प्रश्न सुरु झाले. बायो–बबल म्हणजे काय? जर खेळाडू बायो–बबलमध्ये रहातात तरी पॅाझीटीव्ह आलेच कसे ?. सर्वात महत्वाची बाब अशी आहे की खेळाडू बायो–बबल मध्ये रहातात म्हणजे बायो–बबल नावाचे एखादे मशीन किंवा फुगा नसून एक असे वातावरण आहे ज्यात खेळाडंची सुरक्षितता आणि संसर्गापासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. बाहय जगापासून खेळाडूंना संसर्ग होणार नाही यासाठी घेतली जाणारी विशेष काळजी म्हणजे बायो–बबल. बायो–बबलमध्ये रहाणे हे जरी बाहेरुन उत्कंठा वाढवणारे वाटत असले तरी प्रत्यक्षात माञ अतिशय कठीण आहे. कारण साध्या सोप्या भाषेत सांगायचे झाले तर या प्रक्रियेला नजरकैद असाच शब्द योग्य ठरतो.
काय असते बायो–बबल ॽ
बायो–बबलची सुरुवात होते ती क्वारंटाईन प्रक्रियेपासून. बायो–बबलमध्ये प्रवेश करण्यापुर्वी ठरवून दिलेले दिवस खेळाडूंना सुरक्षिततेच्या कारणाने क्वारंटाईन रहावे लागते आणि आरटीपीसीआर निगेटीव्ह आल्यानंतर तो खेळाडू इतर खेळाडूंसोबत बायो–बबलमध्ये रहायला सुरूवात करतो. खेळाडूंना रहाण्यासाठी अतिशय एकांतात व सुरक्षीत जागा निवडली जाते. तिथे अधिकृत व्यक्तींशिवाय इतर कुणालाही प्रवेश नसतो. अशी जागा म्हणजे निश्चीतपणे एखादे हॉटेल. संघ व्यवस्थापनातले लोक, खेळाडू, स्टाफ आणि हॉटेलचे कर्मचारी यांना हे बायो–बबल सोडून इतर ठिकाणी जाता येत नाही. हाताला बांधलेला ब्लु टूथ बॅण्ड किंवा इतर माध्यमातूंन या सर्वांच्या हालचालीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बारकाईने नजर ठेवली जाते. ठरवून दिलेल्या सीमेत रहायचं, बाहेर जायचं नाही. हो, जर खेळाडूंच्या कुटूंबातले सदस्य बायो–बबलमध्ये नसतील तर त्यांनाही भेटायचं नाही आणि बोलायचं नाही हा कडक नियम. नियम पाळला नाही तर दंड केला जावू शकतो किंवा खेळाडूंना काही दिवसांसाठी किंवा कायमचे निलंबित देखील केले जावू शकते.
खेळाडूंना विरंगुळा म्हणून अशा ठिकाणी आधुनिक इनडोअर गेम्स खेळण्याची व्यवस्था केली जाते. इतर खेळाडूंना त्यात एकञ येवून सहभागी होण्याची परवानगी दिली जाते, गप्पा टप्पा होवू शकतात … पण सर्व काही विशेष काळजी घेवूनच. म्हणजे तिथेही बंधने आलीच. हॉटेल ते मैदान बसचा प्रवास, त्या बसचा चालक ठरलेला, तोच घेवून जाणार, सामना संपला की पुन्हा हॉटेलवर. बाहेर फिरणं नाही की क्षणभर विरंगुळा म्हणून कुठे थांबणं नाही. रिस्क फ्री आयुष्य म्हणजे बायो–बबल आणि त्याचबरोबर ठरवून दिलेल्या बंधनात राहूनच आयुष्य जगणे म्हणजे बायो–बबल. बायो–बबलचे कामकाज नेमुन देण्यात आलेली कंपनी ही या क्षेञातली प्रोफेशनल कंपनी असल्याची माहिती आहे व त्यातले जाणकार बायो–बबल भेदले जाणार नाही याची सर्व काळजी घेत असतात.
बायो–बबलच्या माध्यमातून अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन यशस्वीपणे पार पडले असल्याची उदाहरणे आहेत. परंतु, इतर स्पर्धा आणि आयपीएल यात फरक आहे. ५२ दिवसांचा मोठा कार्यक्रम, जवळपास ६० पेक्षा जास्त सामने, आठ संघ, त्यांचे वेगवेगळे व्यवस्थापक, फ्रचायझी आणि स्टाफ या सर्वांना सुरक्षीत बायो–बबलमध्ये ठेवणे एक आव्हान आहे. एका मैदानावर एका वेळी ४–४ संघ रहातील ही कल्पना जरी चांगली असली तर त्यामुळे फार फार तर रिक्स कमी होते, संपत नाही हे तितकेच खरे आहे. बीसीसीआय किंवा आयपीएल गर्व्हनींग कौन्सील यांना खेळांडूंसह सर्वाचीच काळजी आहे. एका चांगल्या व्यवस्थापनामुळेच आत्तापावेतो आयपीएलचे जवळपास निम्मे सामने पार पडले आहेत. परंतु, या आजाराचे कारनामे काही कमी नाहीत… त्यामुळेच कोवीड हे सुरक्षित बायो–बबल असेच भेदत राहीला तर आयपीएलच्या पुढच्या सामन्यांवर संकट येईल हे निश्चीत.