कळवण – १०० टक्के आदिवासी तालुके असलेल्या कळवण व सुरगाणा या दोन्ही तालुक्यात गेल्या सप्ताहात झालेल्या मुसळधार पावसामुळे व नदी – नाल्याच्या पूरपाण्यामुळे शेतीपिकांचे तसेच शेतातील बांध उध्वस्त शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरांची पडझड होऊन नागरिकांचे व शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून कळवण सुरगाणा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी कळवणचे आमदार नितीन पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की,गेल्या पाच सहा दिवसापासून कळवण सुरगाणा तालुक्यात जोरदार अतिवृष्टी होत असून अतिवृष्टीमुळे सर्व सामान्य माणसांचे दैनदिन जीवन विस्कळीत झालेले असून अनेक ठिकाणी नदी , नाल्यांना पूर येऊन शेती व इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. १०० टक्के आदिवासी असलेल्या कळवण सुरगाणा तालुक्यातील शेतीचे व शेत पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे . पेरणी केलेली खरीप पिके पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे .
शेतकरी हा अस्मानी संकटात सापडला आहे. कळवण तालुक्यात १ ते १० जुलैच्या दरम्यान १७८.३३ मिमी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे आदिवासी भागातील नदी, नाले व डोंगर उतारालगत असलेल्या शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून , तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचे व चाळीतील कांद्याचे नुकसान झाले. कळवण तालुक्यात काही ठिकाणी शेतीचे नुकसान होऊन बांध तुटले . तर घरांची पडझड , विहिरींचे नुकसान झाले आहे . शेतकऱ्यापुढे या शेतजमिनी विकसित करण्याचे शेती योग्य करण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे . खरीपाची पेरणी केलेली पिके वाहून गेल्याने दुबार पेरणीचे संकट असून आता या शेतकऱ्यांना नव्याने बियाणे खरेदी करणे , शेतीची मशागत करणे त्यासाठी लागणारी खते , मजुरी हे सर्व प्रश्न निर्माण झालेले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरांची देखील पडझड झालेली असल्याने निवाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे .
सुरगाणा तालुक्यातील अलंगुण या गावातील पाझर तलाव अतिवृष्टीने फुटल्याने तलावाचे पाणी थेट अलंगुण गावात शिरल्याने नागरिकांची मोठी गैर सुविधा निर्माण झाली आहे . तलावाचे पाणी थेट घरात शिरल्याने घरातील अन्न , वस्त्र व संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झालेले आहे . घरात साठविलेले धान्य भिजून गेल्याने उपासमारीची वेळ ओढवली आहे . त्याचप्रमाणे अनेक गावांना जोडणारी जिल्हा परिषद व सार्वजानिक बांधकाम विभागाची रस्ते व पूल देखील वाहून गेल्याने या नागरिकांचा संपर्क तुटलेला असल्याने दळणवळण विस्कळीत झाले आहे . अनेक ठिकाणी दरडी कोसळून शासकीय व खाजगी मालमत्तेचे देखील नुकसान झालेले आहे . गावातील नागरिकांचे दैनदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झालेले असल्याने या नागरिकांना पुन्हा उभे राहण्यासाठी विशेषत : शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झालेले आहे .
कळवण – सुरगाणा या तालुक्याबरोबर नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण जिल्ह्यातीलच शेतकरी संकटात आला आहे . शेतकरी बांधवाना संकटातून उभे राहण्यासाठी तातडीने पंचनामे करून नागरिकांना मदत उपलब्ध करून देणेकामी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून प्रत्येक शेतकऱ्याला सानुग्रह अनुदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी कळवणचे आमदार नितीन पवार यांनी केली आहे.