इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मणिपूर घटनेने संपूर्ण देशाची मान खालावलेली असतानाच पश्चिम बंगाल येथेही तसाच प्रकार घडल्याची सोशल मिडियात जोरदार चर्चा आहे. मणिपूरमधील घटनेच्या पुनरावृत्तीने खळबळ माजविली आहे. दरम्यान, असाच कुठलाच प्रकार पश्चिम बंगालमध्ये झाला नसल्याचे पोलिस महासंचालकांनी स्पष्ट केले आहे.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या मणिपूरमधील घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय, सामाजिकच नव्हे तर सर्व क्षेत्रातून यावर संताप व्यक्त झाला आहे. अशात तशाच स्वरूपाची घटना बंगालमध्ये घडल्याच्या माहितीने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. मणिपूरमध्ये कुकी आण मैतेयी समुदायांमध्ये सुरू असलेल्या हिंसक संघर्षादरम्यान, येथील दोन महिलांना विवस्त्र करून जमावाने त्यांची धिंड काढल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. येथील हावडा येथे एका महिलेसोबत गैरवर्तन करून तिला विवस्त्र फिरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील महिला उमेदवाराने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर छेडछाड आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. ही घटना ८ जुलै रोजी घडल्याचं सांगण्यात येत आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला विवस्र करून गावभर फिरवल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
व्हिडिओ आणि पोस्टमध्ये म्हटले आहे की, या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तृणमूल काँग्रेसच्या सुमारे ४० ते ५० कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली. माझ्या छातीवर, डोक्यावर दंडुक्याने प्रहार केले. त्यानंतर मला मतदानकेंद्राबाहेर फेकून दिले. दरम्यान, या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या कॉपीमध्ये तृणमूलचे उमेदवार हेमंत राय, नूर आलम, अल्फी एसके, रणबीर पांजा संजू, सुकमल पांजासह अनेक जणांची नावं आहेत. या लोकांनी माझे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. तसेच मला विवस्त्र होण्यास भाग पाडले. सर्वांसमक्ष माझी छेड काढली. तसेच मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.
काय म्हणाले पोलिस महासंचालक
पश्चिम बंगालचे पोलिस महासंचालकांनी यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, असा कुटलाही प्रकार बंगालमध्ये घडलेला नाही. कुणी तरी ही अफवा पसरवत आहे. त्यावर विश्वास ठेऊ नये. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या अज्ञात शक्तींवर कुणीही विश्वास ठेऊ नये किंवा खात्री न करता कुठलीही पोस्ट फॉरवर्ड करु नये किंवा शेअर करु नये, असे त्यांनी सांगितले आहे.