इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पश्चिम बंगालमधील कुचबिहारमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनात विजेचा प्रवाह पसरून वाहनातील तब्बल 10 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर याच वाहनातील 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वाहन चालक फरार झाला आहे.
पिकअप वाहनातून 27 जण प्रवास करत होते. विजेचा धक्का लागून जखमी झालेल्यांना जलपाईगुडीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहनामध्ये डीजे सिस्टिमसाठी लागणारे जनरेटर होते. त्यामुळे पिकअप वाहनात वीज प्रवाह पसरून ही दुर्घटना घडली. यामध्ये 10 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 16 जण जखमी झाले आहेत.
ही भयानक दुर्घटना मेखलीगंज पोलीस स्थानक परिसरातील धरला ब्रिजवर घडली. माताभंगाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित वर्मा यांनी सांगितले की, मध्यरात्री 12 वाजता पिकअप वाहनात वीजप्रवाह पसरून ही दुर्घटना घडली आहे. डीजे सिस्टीमसाठी पिकअपमध्ये ठेवण्यात आलेल्या जनरेटमुळे हा वीजप्रवाह पिकअपमध्ये पसरुन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
वाहनाच्या मागील बाजूस जनरेटर ठेवण्यात आले होते. या वाहनातील 27 पैकी 16 जण गंभीर जखमी झालेल्यांना चंगरबंधातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 10 जणांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. वाहनात बसलेले सगळे सीतलकुचीमधील राहणारे आहेत. जखमी आणि ठार झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी राज्य शासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
West Bengal Major Accident 10 dead 16 injured