इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या देशात भारतीय राज्यघटनेनुसार संसदेत लोकसभा आणि राज्यसभेचे निर्मिती करण्यात आली आहे , तर विविध राज्यांमध्ये विधानसभा असतात. लोकसभा असो की विधानसभा, त्यांच्या बैठकांचे वर्षातून दोन किंवा तीन वेळा सत्र होतात. परंतु हे सत्र बहुतांश वेळा सकाळी सुरू होऊन सायंकाळी संपतात. क्वचितप्रसंगी रात्री उशिरापर्यंत हे सत्र चालतात. परंतु चक्क थेट रात्रीच्यावेळी विधानसभेचे बैठक बोलावण्याची कदाचित पश्चिम बंगालच्या इतिहासातील पहिलीच घटना असावी. पश्चिम बंगालच्या ममता सरकारसोबतच्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल जगदीप धनखर यांनी दि. ७ मार्च रोजी रात्री २ वाजता विधानसभेची बैठक बोलावली आहे. अशी अवेळी विधानसभा बोलविण्याबाबत राज्यपाल जगदीप धनखर म्हणाले की, त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या आदेशानुसार हा निर्णय घेतला आहे.
राज्यपाल जगदीप धनखर यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, राज्यघटनेच्या कलम १७४ अन्वये पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी ७ मार्च रोजी रात्री २ वाजता राज्य विधानसभेची बैठक बोलावली आहे. तसेच राज्यपाल धनखर यांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून विधानसभेची बैठक बोलावण्याची सूचना शेअर केली आहे. त्याचवेळी, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, रात्री दोन वाजता विधानसभेची बैठक बोलावणे असामान्य आहे आणि हा एक प्रकारचा इतिहास बनू शकतो. मात्र हा निर्णय मंत्रिमंडळाचा आहे. राज्यघटनेच्या कलम १७४ (१) चे पालन करून, मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य करून, ७ मार्च २०२२ रोजी रात्री २.०० वाजता विधानसभेची बैठक बोलावण्यात आली आहे. विधानसभेची बैठक मध्यरात्री आयोजित करणे, हा असामान्य आणि इतिहास आहे, परंतु तो मंत्रिमंडळाचा निर्णय आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष विमान बॅनर्जी यांनी रात्री २ वाजता विधानसभेची बैठक बोलावण्याबाबत सांगितले की, काही टायपोग्राफिकल चूक झाली असावी, वास्तविक ती टाळता आली असती. राज्य सरकारने जेव्हा माहिती पाठवली तेव्हा त्यात दुपारी २ वाजेचा उल्लेख होता. आता ते काय निर्णय घेतात हे मंत्रिमंडळावर अवलंबून आहे. एका रिपोर्ट्सनुसार, राज्यपाल जगदीप धनखर यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना मंत्रिमंडळाने विधानसभा बोलावण्यासाठी पाठवलेल्या शिफारशीवर चर्चा करण्यासाठी बोलावले होते. मात्र मुख्य सचिव राज्यपालांना भेटायला आले नाहीत. त्यानंतर राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या शिफारशीला मान्यता दिली आणि ती सूचनाही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली. यापूर्वी राज्यपाल जगदीप धनखर यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ७ मार्चपासून विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याची शिफारस परत पाठवली होती. मात्र तेव्हा राज्यपालांनी घटनात्मक नियमांचे पालन न केल्याचे कारण देत शिफारस परत पाठवली होती. राज्यपालांच्या या निर्णयावर तृणमूलच्या नेत्यांनी जगदीप धनखर यांच्यावर प्रशासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप केला.