इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे आज, रविवारी सकाळी मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथील ओंडा रेल्वे स्थानकाजवळ दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या. ही टक्कर इतकी भीषण होती की दोन्ही मालगाड्यांचे इंजिन केवळ रुळावरून घसरले नाही तर जागीच उलटले. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये रेल्वे ट्रॅक आणि मालगाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसत आहे.
या घटनेनंतर खरगपूर-बांकुरा-आद्रा रेल्वे मार्ग बंद करण्यात आला आहे. या घटनेत किती नुकसान व जीवितहानी झाली याबाबतची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही. या घटनेनंतर खरगपूर-आद्रा दरम्यान धावणाऱ्या १४ गाड्या रद्द करण्यात आल्या, तर तीन गाड्या वळवण्यात आल्या, तर दोन गाड्यांचे स्थानक बदलण्यात आले.
नेमकं काय घडलं?
दक्षिण-पूर्व रेल्वेने सांगितले की, रेल्वेची देखभाल करणारी गाडी ओंडग्राम स्थानकाकडे जात होती. दरम्यान, मालगाडीनेही रेड सिग्नल ओलांडला आणि ती थांबली नाही. मालगाडीची बीआरएन मेंटेनन्स ट्रेनशी टक्कर झाली. पहाटे ४.०५ वाजता मालगाडीचे आठ डबे रुळावरून घसरले. रेल्वे कर्मचाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले असून रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. अप मेल लाईन आणि अप लूप लाईन सकाळी ८.४५ पर्यंत कार्यान्वित करण्यात आल्या.