विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली/कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये २९२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने मुंसडी मारत दोनशेहून अधिक जागांवार बाजी मारली आहे. भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसने ही लढाई प्रतिष्ठेची केली होती. यामध्ये बंगालच्या जनतेने पुन्हा ममता दिदींना साथ दिली आहे. भाजपला शंभरहून कमी जागांवर समाधान मानावे लागले आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदिग्राम जागेवर पिछाडीवर होत्या. मात्र त्यानंतर त्यांनी आघाडी घेतली.
बंगालमध्ये विधानसभेच्या जागांसाठी सकाळी ८ वाजेपासून १०८ केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात झाली. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण २,११६ उमेदवार आहेत. बंगालमध्ये २७ मार्चपासून २९ एप्रिलपर्यंत आठ टप्प्यात मतदान झाले होते. कोरोना महामारीमुळे निवडणुकीवर काहीच परिणाम झाला नाही. राज्यात ८४ लाख ७७ हजार मतदार असून एकूण ८० टक्के मतदान झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी संपूर्ण तयारी केली होती. तसेच कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर शारिरीक अंतर राखण्यासह कोविडच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही निवडणूक आयोगाने दिले होते.
ममता दीदींना राखला गड
ममता बॅजर्जी गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असून, प. बंगामधील जनतेने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. ममता यांच्यासमोर भाजपने कडवे आव्हान ठेवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी मैदानात उतरून प्रचार केला. शिवाय ममता दिदींच्या अनेक विश्वासू सहकार्यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपकडून निवडणूक लढविली होती. ममता बॅनर्जी यांच्या कारकीर्दीलाच आव्हान देण्यात आले होते.
भाजपकडून सुरूंग लावण्याचा प्रयत्न
तत्कालीन मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री असलेलेल शिशिर अधिकारी यांचे पुत्र सुवेंदू अधिकारी यांना हाताशी धरून ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राम मतदारसंघ तयार केला होता. त्यामुळे हा मतदारसंघ डाव्यांच्या हातातून येत तृणमूलच्या झोळीत आला. तेव्हापासून येथे तृणमूलचेच वर्चस्व आहे. मात्र यंदा चित्र बदलले. ममता बॅनर्जी यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे नोव्हेंबरमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी मंत्रिपदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. डिसेंबरमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने याचाच फायदा घेत सुवेंदू अधिकारी यांना नंदिग्राममधून उमेदवारी दिली. ममता बॅनर्जी यांनीही भोवानीपूर येथील मतदारसंघ सोडून थेट नंदिग्राम मतदारसंघ निवडला. दोन मतदारसंघांचा पर्याय नाकारून नंदिग्राममधूनच उमेदवारी अर्ज भरून अधिकारी यांच्यासह भाजपलाच उलट आव्हान दिले आणि निवडणूक प्रतिष्ठेची केली. भाजप आणि तृणमूल या दोन्ही पक्षांनी जोरदार प्रचार केला.
आकडेवारी अशी
(एकूण जागा २९२. बहुमतासाठी आवश्यक जागा १४७)
तृणमूल काँग्रेस – २१९
भाजप – ७१
काँग्रेस, डावे पक्ष – १
इतर – १