इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मीडिया प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. सोशल मीडियाचा प्रत्येकाच्या आयुष्यावर प्रचंड प्रभाव असल्याच्या विविध घटना दररोज घडत असतात. अशात पश्चिम बंगालमधील एका विद्यार्थ्याने चक्क यूट्युब पाहून बँक लुटण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
पश्चिम बंगालमधील पुरुलियामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेट बँकेत फिल्मी स्टाईलमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. युट्यूबवरील व्हिडीओ पाहून आरोपीने बँकेत दरोडा टाकण्याची योजना आखली होती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने बँकेचा दरवाजाही फोडला होता. दरवाजा तोडल्यानंतर तो एकटाच दरोडा टाकण्यासाठी बँकेत घुसला, मात्र तेवढ्यात बँकेतील इमर्जन्सी अलार्म वाजला. अलार्म वाजल्यानंतर त्याने बँकेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र तो पकडला गेला.
समीर अन्सारी असे आठवी पास झालेल्या या तरुणाचे नाव आहे. त्याची दरोड्याची योजना ऐकून पोलीसही चकित झाले. पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, अटक करण्यात आलेल्या तरुणाने यूट्यूब व्हिडीओ पाहून दरोड्याची योजना आखली होती. आरोपी पुरुलिया हुडा पोलीस ठाण्याच्या दुमदुमी गावात आहे. पुरुलिया जिल्ह्याचे पोलीस एसपी अभिजीत बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण दरोड्याच्या घटनेच्या मोडस ऑपरेंडीची सविस्तर माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी ड्रिल मशीन, जॅमर इत्यादी अत्याधुनिक उपकरणे वापरली होती. युट्युबवरून त्याने प्रशिक्षण घेतले होते.
यामुळे पटली ओळख
गेल्या शनिवारी रात्री ८.५० च्या सुमारास पुरुलिया बांकुरा ६०-ए राष्ट्रीय महामार्गावरील हुडा येथे सरकारी बँक लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. बँकेचा इमर्जन्सी अलार्म वाजताच तो पळून गेला. पोलिस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळावरून बॅग, अत्याधुनिक व्हॉल्ट कटर आणि वायर जप्त केली आहे. तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी गुन्हेगाराची ओळख पटवली.
West Bengal Crime Youth Arrested Bank Loot Theft
Police Youtube