इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेतील कुचराई झाली आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या गल्लीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पकडले आहे. आरोपीकडून एक शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. पोलिसांचे स्टिकर लावलेल्या वाहनातून आरोपी प्रवास करत होता. सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.
कोलकाता पोलिस आयुक्त विनीत गोयल यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाच्या लेनमध्ये जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला कोलकाता पोलिसांनी रोखले, ज्याचे नाव शेख नूर अमीन आहे. झडतीत शेख नूर अमीनकडून शस्त्रे, एक चाकू आणि अनेक ओळखपत्रांसह प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पोलिस स्टिकर असलेल्या वाहनातून आरोपी प्रवास करत होता. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलीस, एसटीएफ, विशेष तपास शाखा हे सर्व या आरोपीची चौकशी करत आहेत.
आरोपी हा बंगालच्या पश्चिम मेदिनीपूर येथील डेबरा पोलीस स्टेशन परिसरात राहणारा आहे. शेख नूर अमीन हा मानसिक आजारी असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचा दावा आरोपीच्या नातेवाईकांनी केला आहे. कालीघाट येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तो कसा पोहोचला हे माहित नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तसेच ते म्हणाले की आरोपी व्यक्ती मेदिनीपूर येथे त्याच्या सासरच्या घरी राहत होता आणि सोमवारी कोलकात्याला निघाला होता.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाभोवती नेहमीच कडक सुरक्षा व्यवस्था असते. सुरक्षेचा बंदोबस्त अतिशय कडेकोट असला तरी तृणमूल काँग्रेसने शुक्रवारी धर्मतळा येथे शहीद दिनाचे आयोजन केले आहे. त्यामुळे आज धर्मतळा व परिसरासह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या अमीनच्या बॅगेतून शस्त्रे आणि ड्रग्जही जप्त करण्यात आले आहेत. आरोपीला पकडले असता तो मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या मिलन संघ क्लबच्या गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडून विविध संघटनांचे कार्डही सापडले असल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोपीकडील गाडीच्या मालकाचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात ममता बॅनर्जींना या राजकीय पटलावर विरोधाचा सामना करावा लागत आहे. पण, त्यांच्यावर आतापर्यंत कोणी असा प्राणघातक हल्ला केला नाही. त्यामुळे या तरुणाच्या मनात नेमके काय होते. त्याने कोणाच्या सांगण्यावरुन हा प्लॅन केला होता का? हे सर्व चौकशीतूनच समोर येईल.