कोलकाता (पश्चिम बंगाल) – राजकीय रणसंग्रामात ममता बॅनर्जी यांनी भाजपला धोबीपछाड दिल्यानंतर त्याचे पडसाद अनेक दिवस उमटत राहिले. बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी हल्ले केल्याचे आरोप करण्यात आले. परंतु आता नवे सरकार स्थिरस्थावर झाल्यानंतर निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेले नेते, कार्यकर्ते पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये परतू लागले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मनधरणी केली जात आहे. काही भाजपचे कार्यकर्ते तर चक्क गावांमध्ये फिरून भाजपमध्ये गेल्याची चूक केल्याचे मान्य करत ध्वनिक्षेपकावरून जनतेची जाहीर माफी मागत आहेत.
बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील निवडणूक प्रचारादरम्यानचा विस्तव कमी होताना दिसत नाही. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांसह गृहमंत्री अमित शाह यांना थेट आव्हान दिल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. परंतु स्थानिक पातळीवर निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणारे तृणमूलच्या नेते आणि कार्यकर्त्यांची घरवापसी होऊ लागली आहे.








