इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क- पश्चिम बंगालच्या कथित शिक्षक भरती घोटाळ्यात अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून कोट्यावधी रुपयाची संपत्ती जप्त केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणातील दुसरे आरोपी माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांचाही सहभाग असल्याने त्यांनाही जेरबंद केले आहे. त्यातच आता नवीन माहिती समोर आली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयाला सांगितले की, अर्पिता मुखर्जीच्या नावे 31 जीवन विमा पॉलिसी जप्त करण्यात आल्या आहेत. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे या पॉलिसींमध्ये पार्थ चॅटर्जी यांना नॉमिनी करण्यात आले आहे. केंद्रीय तपास एजन्सीने म्हटले आहे की त्यांना भागीदारी फर्मची कागदपत्रे देखील सापडली आहेत.
ईडीकडे रिमांड मागणाऱ्या कॉपीमध्ये पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता कोणत्या संगनमताने काम करत होते हे सांगण्यात आले होते. मात्र, या प्रकरणात पहिल्यांदाच ईडीने या दोघांमधील थेट संबंध न्यायालयासमोर दाखवला. कोलकाता येथील विशेष न्यायालयाने चॅटर्जी आणि मुखर्जी यांना उद्या दि. ५ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत पाठवले आहे. ईडीच्या अहवालात अर्पिता आणि पार्थच्या नातेवाइकांच्या बोलपूरमधील संयुक्त मालमत्तेच्या हस्तांतरणाचा उल्लेख आहे.
ज्याचे कार्यालय बेलघारियातील क्लब टाऊन हाईट्सच्या फ्लॅटमध्ये नोंदणीकृत आढळले. ईडीने येथून २७.९ कोटी रुपये जप्त केले आहेत. अर्पिताच्या दोन फ्लॅटमधून आतापर्यंत 49.8 कोटी रुपये रोख आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. हे दोन फ्लॅट, एक टॉलीगंजजवळ डायमंड सिटी साऊथमध्ये आणि दुसरा बेलघारियातील क्लब टाऊन हाइट्समध्ये. दोघांची नोंदणी अर्पिता मुखर्जीच्या नावावर करण्यात आली होती.
पार्थ चॅटर्जी तपासात सहकार्य करत नसून बहुतांश प्रश्नांची उत्तरे देण्यात मौन बाळगून असल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले आहे. दुसरीकडे, पार्थ चॅटर्जीचे म्हणणे आहे की, आपल्याला कटाचा बळी बनवण्यात आले आहे. दरम्यान, शिक्षक भरती घोटाळ्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
तृणमूल काँग्रेसवर हल्ला करताना भाजपचे शुभेंदू अधिकारी म्हणाले की, पार्थ चॅटर्जी या प्रकरणात फक्त एक प्यादा आहे, त्याचे नेते स्वतः मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ममता बॅनर्जी सरकारच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली आहे. पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पार्थ चॅटर्जीचे नाव समोर आल्यानंतर ममता सरकारने त्यांना मंत्रीपदावरून हटवले आहे.
West Bengal Arpita Mukherjee Partha Chatterjee ED Seized LIC Policies
SSC Recruitment Scam