विशेष प्रतिनिधी, मुंबई
देशातील आघाडीची पिझ्झा कंपनी डॉमिनोजकडे असलेला १८ कोटी भारतीयांचा डेटा गेल्या महिन्यात चोरी झाला आणि आता तो हॅकर्सने सार्वजनिक केला आहे. त्यामुळे दोनशे रुपयांचा पिझ्झा आर्डर करून लाखो रुपयांची असुरक्षितता ओढवून घेण्याची वेळही एखाद्या ग्राहकावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हॅकर्सने डार्क वेबवर या डेटासाठी सर्च इंजिन तयार केले आहे. यावर ग्राहकांची खासगी माहिती अर्थात मोबाईल क्रमांक, ई–मेल आयडी आणि जीपीएस लोकेशन सहज प्राप्त करणे शक्य आहे.
सायबर सुरक्षा एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही कधी डॉमिनोजवरून ऑनलाईन आर्डर केले आहे तर तुमचीही माहिती सार्वजनिक होण्याची शक्यता आहे. आता ग्राहकांची हेरगिरी करण्यासाठी या डेटाचा वापर केला जात असल्याची माहिती आहे. साधा मोबाईल क्रमांक टाकून लोकेशन व इतर माहिती शोधणे शक्य आहे. गोपनियतेचा भंग या माध्यमातून झालेला आहे.
क्रेडिट कार्डची माहिती
डॉमिनोजचा तब्बल १३ टीबी डेटा हॅक केल्याचा दावा हॅकर्सने केला आहे. २५० कर्मचारी आणि १८ कोटी ग्राहकांची माहिती त्यांच्या हाती लागली आहे. डॉमिनोजची पितृसंस्था ज्युबिलियंट फूड वर्क्स यांनी डेटा हॅक झाल्याचे मान्य केले आहे. मात्र ग्राहकांची आर्थिक माहिती लिक झाली नसल्याचा दावाही केला आहे. मात्र हडसन रॉक या सिक्युरिटी एजन्सीने यात १० लाख क्रेडिट कार्डची माहितीही लिक झाल्याचा दावा केला आहे.