न्यूयॉर्क – जगभरात हाहाकार माजविलेल्या कोरोनाची सुरुवात नेमकी कुठून झाली? किंवा कोरोनाचा उगम कुठे झाला आहे हा संपूर्ण जगाला छळणारा यक्षप्रश्न आहे. यासंदर्भात अखेर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आरोग्य सल्लागार आणि जगविख्यात शास्त्रज्ञ डॉ. अँथनी फासी यांनी भाष्य केले आहे. त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा त्यांच्या या वक्तव्याकडे खिळल्या आहेत.
कोरोनाच्या जन्माबाबत अद्यापही तर्क-वितर्क लावले जात आहेत. परंतु संशयाची सुई चीनकडेच असून त्यांच्या प्रयोगशाळेतच कोरोना विषाणूची निर्मिती झाली असावी, असा जागतिक पातळीवर तज्ज्ञांचा अंदाज आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांनी देखील आता याला दुजोरा दिला आहे. जागतिक पातळीवरील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी फासी यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणू हा प्रयोगशाळेत तयार केलेला असू शकतो.
कोविड -१९ साथीचा रोग पसरविणारा हा विषाणू केवळ फेब्रुवारी २०२० मध्ये प्रयोगशाळेत तयार झाला असावा, असा अमेरिकन शास्त्रज्ञांना संशय आहे. यासंदर्भात बोलताना डॉ. फासी म्हणाले की, लॅबमधून कोरोना विषाणू तयार होण्याच्या चर्चेच्या आधी देखील हा विषाणू प्रयोगशाळेत तयार झाला होता. कदाचित हा विषाणू अपघाताने चीनच्या वुहानमधील लॅबच्या बाहेर आला असावा. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्राथमिक चौकशीनंतर आलेल्या अहवालावर प्रश्न विचारल्यानंतर पुन्हा एकदा या चर्चेला वेग आला आहे की, वुहानच्या प्रयोगशाळेत कोरोना विषाणू तयार झाला होता.
कोरोना विषाणूचे मूळ ९० दिवसात शोधण्याचे आदेश अध्यक्ष जो बायडेन यांनी दिले आहेत. यापूर्वी वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले होते की, चीनने कोविड -१९ चा पहिला रुग्ण डिसेंबर मध्ये मिळल्याचे म्हटले आहे. वास्तविक वुहानमधील विषाणूशास्त्र संस्थेमध्ये कार्यरत तीन संशोधकांना महिनाभरापूर्वी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये आजारी पडल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या तिन्ही संशोधकांमध्ये कोविड सारखी लक्षणे आढळली होती. परंतु चीनने ही माहिती दडवून ठेवली होती.
जगभरातील अनेक देशांमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे ४० लाखाहून अधिक जणांचा जीव गेला आहे. अमेरिका आणि ब्रिटन सारख्या देशांमध्ये नवीन प्रकरणे आणि मृत्यूची संख्या कमी झाली आहे. त्याच वेळी, अनेक देशांमध्ये लसीची कमतरता आहे आणि लसीचा डेल्टा अवतार आता मोठी समस्या बनू पहात आहे.