विशेष प्रतिनिधी, पुणे
चार दशकांपूर्वी आपल्या पृथ्वीला धोका निर्माण झाला होता हे तुम्हाला ठाऊक आहे का? पृथ्वीपासून साधारण १५ ते ४० किलोमीटर अंतरावरील संरक्षक कवच म्हणून ओळखला जाणारा ओझोनचा थर मानवनिर्मित क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे (सीएफसी) क्षीण होत चालला होता. हा थर वाचविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या (युनेप) माध्यमातून मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) एका व्यक्तीने मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच ओझोनचा थर वाचविण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.
डॉ. राजेंद्र शेंडे असे या व्यक्तीचे नाव आहे. डॉ. शेंडे यांचा सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास थक्क करणारा आहे. ग्रामीण भागातील शाळेतील एक विद्यार्थी थेट मुंबई आयआयटीपर्यंत झेप घेतो आणि त्यानंतर तो मागे वळून पाहतच नाही. अगदी संयुक्त राष्ट्र संघांच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमात निवड झाल्यानंतरही. जागतिक आणि खुल्या स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे त्यांची संयुक्त राष्ट्र संघांत निवड झाली.
मॉन्ट्रियल कराराचे यश
मानवनिर्मित रसायनांद्वारे ओझोन वायूचा थर क्षीण होत असताना ही रसायने कमी करण्यासाठी विकसनशील देशांमध्ये क्षमता विकसित करण्याचे मोठे शिवधनुष्य डॉ. शेंडे यांच्या खांद्यावर आले. युनेपच्या माध्यमातून क्लोरोफ्लोरोकार्बनचे उत्सर्जन घटविण्यासाठी त्यांनी नावीन्यपूर्ण यंत्रणा राबविलीच. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांच्या मंचाने स्वाक्षरी केलेल्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलनुसार घातक रसायने कमी करण्याचे ध्येयही मुदतीत साध्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेला करार हा एक उत्तम बहुपक्षीय पर्यावरणीय करार म्हणून ओळखला जात आहे. विशेष म्हणजे जागतिक पातळीवर करण्यात आलेला आणि त्याची अंमलबजावणी झालेला हा एकमेव करार आहे. आणि त्याच्या अंमलबजावणीत डॉ. शेंडे यांचे योगदान अमूल्य आहे.
युवकांसाठी मोठे कार्य
डॉ. शेंडे यांच्या कामाचा झपाटा वाढला आहे. आता त्यांचा वातावरण बदलाच्या मुद्यावर लढा सुरू झाला आहे. त्यांच्या कामात त्यांना युवकांनाही सहभागी करून घ्यायचे आहे. त्यासाठी विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांची साखळी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. प्रत्येक विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये कार्बन डाय आॉक्साईड (CO2) चे उत्सर्जन रोखण्यासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापकांकडून स्किल बील्डिंगचे प्रात्यक्षिक करून घेतले जात आहे. ‘नॉट झीरो, बट नेट झीरो’, असे या प्रकल्पाचे नाव आहे.
नोबेल सन्मानपत्राने गौरव
ओझोन वायूच्या संरक्षणासाठी त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००७ मध्ये जागतिक शांतता नोबेल पुरस्कार हा आयपीसीसी या समितीला देण्यात आला. या समितीने जागतिक तपमान वाढीबाबत महत्त्वपूर्ण संशोधन करुन आगामी काळातील धोके जगासमोर आणले. पर्यावरण सुरक्षित राहिले तर जगात शांतता नांदेल या उद्देशाने हा पुरस्कार आयपीसीसीला देण्यात आला. आयपीसीसीच्या अहवालाच्या निर्मितीत डॉ. शेंडे यांचा वाटा मोलाचा होता. त्यामुळेच नोबेल पुरस्काराअंतर्गत आयपीसीसीच्या सर्व चमूला सन्मानपत्राने गौरविण्यात आले. त्यात डॉ. शेंडे यांचाही समावेश आहे. त्यामुळे प्रथमच मराठी शास्त्रज्ञाचा नोबेल सन्मानपत्राने गौरव झाला आहे.