विशेष प्रतिनिधी, नाशिक
नाशिक शहरासह जिल्ह्यात शनिवार आणि रविवार लग्न समारंभांसाठी परवानगी मिळाली असली तरी मोठी अडचण निर्माण झाल्याचे समोर येत आहे. यापूर्वी केवळ सोमवार ते शुक्रवार या दिवशीच लग्न सोहळ्यांना परवानगी होती. जून आणि जुलै हे दोनच महिने लग्न तिथी आहेत. त्यातच शनिवार आणि रविवार बंदी असल्याने मोठीच समस्या विवाह कार्य असलेल्या कुटुंबांसह लग्नकार्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांपुढे निर्माण झाली. यासंदर्भात मंगलकार्य व लॉन्स असोसिएशनने पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. त्यांच्यासमोर नेमक्या अडचणी मांडल्या. त्याची दखल पालकमंत्र्यांनी घेतली आणि याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोरोना आढावा बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली. अखेर शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी लग्न समारंभांना परवानगी देण्यात आली. त्याचे आदेशही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहेत. मात्र, या परवानगी नंतरही अनेकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. कारण, आदेशात म्हटले आहे की, दररोज विवाह कार्याला परवानगी असली तरी केवळ ४ वाजे पर्यंतच विवाह करता येणार आहेत. ज्यांनी गोरज मुहुर्तावर (सायंकाळचे) लग्न कार्य निश्चित केले आहे त्यांनी आता काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वधू आणि वर या दोघांच्याही राशींनुसार विवाह तिथी आणि वेळ निश्चित केली जाते. हिंदू धर्मात अशाच लग्न कार्य केले जाते. त्यामुळे ज्यांच्याकडे गोरज मुहुर्तावर लग्न आहे त्यांनी ४ वाजेच्या आत म्हणजेच घटिक मुहुर्तावर केवळ प्रशासनाच्या सांगण्यानुसार लग्न करायचे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत अनेक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शनिवार आणि रविवार बंदी नंतर आता सरसकट सायंकाळच्या विवाहास बंदी असल्याने लग्न कार्याशी निगडीत सर्वच व्यावसायिक आणि कुटुंबे प्रचंड चिंतेत सापडली आहेत.
यापुढील काळातील विवाह मुहुर्त असे
जून
१६, १९, २०, २२, २३, २४
जुलै
१, २, ७, १३, १५
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या तीन महिन्यात विवाह मुहूर्त नाहीत.
नोव्हेंबर
१५, १६, २०, २१, २८, २९, ३० नोव्हेंबर
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असे