गुरूचा अस्त काळ हा येत्या 23 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. हा काळ 27 मार्च पर्यंत असणार आहे. या काळात गुरु ग्रहाचा अस्त होत असल्याने विवाह त्याचप्रमाणे कोणत्याही शुभकार्यासाठी शुभ मुहूर्त नाही. प्रत्येक शुभकार्यासाठी गुरूचे पूजन हा प्रत्येक धार्मिक अथवा शुभ विधी प्रसंगी प्रथमतः महत्त्वाचा विधी असतो. त्याचप्रमाणे कुंडलीतील मंगळ याचे स्थान देखील बघितले जाते.
गुरू लाभात असणे व मंगळ नसणे आवश्यक असते. म्हणूनच धार्मिक कार्यात वापरले जाणारे हळदी कुंकू यातील यातील हळद म्हणजे पिवळा रंग हा गुरुचे द्योतक आहे, तर कूंकुवाचा लाल रंग मंगळाचा द्योतक आहे. वरील काळात ज्योतिष शास्त्राप्रमाणे गुरुचा अस्त होत असल्याने शुभ कार्य करू नयेत असा संकेत आहे.
कुंडलीचा अभ्यास करताना गुरु ग्रह, त्याची स्थिती व युती पाहिले जाते. गुरू हा सात्विकता, प्रामाणिकपणा, भक्तिभाव, सचोटी, स्वभावातील सौम्यता, नीटनेटकेपणा, शब्दातील मृदुता, नात्यांची जपणूक, असेल त्या परिस्थितीत आनंदाने दिवस काढणे, वर्तमानात आनंद मानणे, बडेजाव न करणे याचा द्योतक आहे. गुरूच्या वरील अस्त काळात शुभकार्य टाळण्यासोबतच वाद, कटू प्रसंग, मतभेद टाळणे, नातेसंबंध जपणे आदी गोष्टींची काळजी घेण्याचे संकेत देतो.
कुंडलीतील गुरुचे स्थान आणि व्यक्तिमत्व
कुंडलीतील प्रथम भावात गुरु असल्यास व्यक्ती भावनिक व धार्मिक असते. द्वितीय भावात गुरू असल्यास उत्तम भजनी अथवा भावगीत गायकीचा गळा असतो. तृतीय भावात गुरु असल्यास भावंडांशी उत्तम संबंध असतात. चतुर्थात गुरु असल्यास घरात धार्मिक वातावरण असते. पंचमात गुरू असल्यास उत्तम तसेच परिपूर्ण शिक्षण, षष्ठम भावात गुरू असल्यास चुलत मंडळींशी चांगले संबंध असतात. सप्तम भावात गुरू असल्यास जोडीदारावर निस्सीम प्रेम असते. अष्टम भावात गुरु असल्यास उत्तम आरोग्य सेवाभाव, नवम भावात गुरु असल्यास गुरुकृपा होते. दशम भावात गुरु असल्यास नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी संपादन होते. एकादश भावात गुरू असल्यास मित्रपरिवारात आदराचे स्थान असते. द्वादश भावात गुरु असल्यास उत्तम संसार होतो. अशा पद्धतीने प्राथमिकरित्या कुंडलीतील गुरूच्या स्थानावरून अंदाज बांधला जातो. ज्योतिष शास्त्राप्रमाणे जीवनातील वास्तु विषयक, आर्थिक, भावनिक, मानसिक, सामाजिक नातेसंबंध विषयक, गृहसौख्य विषयक, स्थैर्य याचा संबंध कुंडलीतील गुरु चे स्थान ठरवते.