अलेप्पी (केरळ) – असे म्हटले जाते की, ‘लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात ‘ त्यामुळे एखाद्याचे जोडीदारावर प्रेम असेल तर लग्न कोठेही होऊ शकते’ सध्याच्या कोरोना काळात केरळमध्ये एक लग्न चक्क रुग्णालयातील कोरोना वार्डात झाले.
एकीकडे देशभरात कोरोनामुळे हृदयद्रावक दृश्य दिसत असताना केरळमधील रुग्णालयातून काही सकारात्मक आणि आनंददायी वाटणारे फोटो समोर आले आहेत. येथील अलेप्पी मेडिकल कॉलेजमध्ये रविवारी एका जोडप्याने लग्नाचे सात फेरे घेतले.
विशेष गोष्ट अशी होती की, वधूने विवाहासाठी लेहंगा ऐवजी पीपीई किट घातले होती. वास्तविक, याच वर कोरोना पॉझिटिव्ह होता. परंतु अखेर वधू जिल्हाधिकाऱ्याच्या मान्यतेने रूग्णालयात पीपीई किटमधील वेशात लग्नाच्या ठिकाणी म्हणजे रुग्णालयात पोहोचली. आणि अखेर नियमांचे पालन करीत शुभमंगल पार पडले.
दरम्यान, कोरोनामध्ये दररोज केरळमध्ये नवनवीन प्रकरणे नोंदविली जात आहेत. रविवारी राज्यात कोरोनाचे 28 हजार 469 नवीन रुग्ण नोंदले गेले, तर विषाणूमुळे 30 रुग्णांचा मृत्यू झाला. केरळमध्ये सध्या कोरोनाची 2 लाख 18 हजार 893 सक्रिय रुग्ण प्रकरणे आहेत. त्याचवेळी, कोरोनामधून केरळमध्ये 5 हजार 110 जणांनी आपला जीव गमावला आहे.