इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या देशात कोणत्याही प्रांतात लग्नकार्य असो त्यामध्ये दारूकाम हे ठरलेलेच असते. दारूकाम म्हणजेच वऱ्हाडी मंडळींसाठी मद्याची रेलचेल असते. परंतु एखाद्या लग्न समारंभात नवरा दारू पिऊन आला तर काय होईल? याचा आपण विचारही करू शकत नाही. परंतु बिहारमध्ये एका गावात अशी घटना घडली. नवरदेवच दारू पिऊन आल्याने नवरीने चक्क लग्नास नकार दिला.
जेहानाबादमधील कलेर परिसरात एका वराला दारू पिणे चांगलेच महागात पडले. जयमलसाठी बनवलेल्या स्टेजवर वराची धडपडणारी पावले पाहून मुलीने लग्नास नकार दिला. वराच्या या कृत्यामुळे संपूर्ण मिरवणुकीला परतावे लागले.
मेहंदिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोधबिघा गावातून मिरवणूक रवाना झाली होती. एका छोट्या वाहनांच्या ताफ्यासह ही मिरवणूक सायंकाळी सहाच्या सुमारास दौडनगरकडे निघाली. येथील एका लग्नमंडपात सर्व विधींसह लग्नाचे कार्यक्रम सुरू होते. तसेच वऱ्हाडी मंडळीची नाच-गाणी सोबत मस्ती चालू होती.
यादरम्यान उत्साही, वधू वरमाला घेऊन वराची वाट पाहत उभी होती. वर आपल्या नातेवाईक व मित्रांसह मजल्यावर पोहोचताच वधूने त्याच्या गळ्यात हार घातला. मात्र वराची लडखडणारी पावले आणि हावभाव पाहून वधूने पुन्हा वरमाला वराच्या गळ्यातून बाहेर काढली आणि त्याला लग्नमंडपातून बाहेर जा असे म्हणत म्हणत लग्नास नकार दिला.
यावेळी वराच्या बाजूने लग्न करण्यासाठी दबाव टाकण्यात आला, परंतु वधूला कोणत्याही किंमतीत नशेत असलेल्या वराशी लग्न करायचे नव्हते. एवढेच नाही तर नववधूने स्टेजवरून खाली उतरून ओढणी, मुंडावळ्या आणि शालू आदि कपडे फेकून दिले आणि मोबाईलवरून पोलिसांना कळवले. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत वधू सात पैकी एकही फेरी न काढता कुटुंबीयांसह घरी परतली.
दरम्यान, दौडनगर पोलिसांनीही तडजोडीसाठी आटोकाट प्रयत्न केले. पण वधूने सांगितले की मद्यधुंद नवरा नको आहे. अखेर वराच्या बाजूचे लोक मिरवणूक काढून घरी परतले. नववधूने अशा प्रकारे लग्नाला नकार दिल्याने चर्चेचा विषय बनला आहे.