इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील अनेक राज्यांमध्ये गोरगरिबांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी होत असते. विशेषतः गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी सरकारच्या वतीने अनुदान देण्यात येते. परंतु काही शासकीय अधिकारी आणि कर्मचारी अशा विविध सरकारी योजनांमध्ये गैरकारभार करून हे अनुदान स्वतः हडप करतात, असाच एक प्रकार उत्तर प्रदेशात उघड झाला आहे.
लग्नाच्या नावाखाली कामगार विभागाकडून अनुदान घेऊन फसवणुकीचा मोठा खेळ उघडकीस आला आहे. काही ठिकाणी तर मुलगी नसताना दोन-दोनदा मुलीचे लग्न झाल्याचे खोटी कागदपत्रे दाखवून अनुदान घेतले. इतकेच नव्हे तर दुसऱ्याची मुलगीही स्वतःची म्हणून दाखवली. मथुरेतील या फसवणुकीप्रकरणी दोन कामगार अंमलबजावणी अधिकारी, लिपिकांसह 10 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कामगार मंत्र्यांनी आढावा बैठकीत इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवांना चौकशीचे आदेश दिले होते. विशेषतः मजुरांच्या मुलींच्या लग्नासाठी राज्य सरकार अनुदान देते, मात्र मथुरेत बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी अनुदानाचे पैसे लुटणारे असे रॅकेट समोर आले आहे.
या रॅकेटमध्ये सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, काही दलालांचा समावेश आहे. याबाबत कामगार विभागाकडे सातत्याने तक्रारी येत होत्या. अनेक कुटुंबात मुलगी नसतानाच तिच्या लग्नाचे अनुदान घेतले. कामगार विभागाकडून मिळालेल्या विवाह अनुदानाची रक्कम हडप करण्यासाठी मोठी फसवणूक करण्यात आली.
तसेच जन्मही न झालेल्या मुलीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून लग्नाचे अनुदान घेतले. काही मुलींची तर दोनदा लग्न झालेली दाखवली होती. मथुरेत फसवणुकीच्या पाच घटना उघडकीस आल्याने विवाह अनुदान देण्याच्या संपूर्ण यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनुदान हडप करण्यासाठी त्यांचे लग्न पुन्हा दोनदा दाखविण्यात आले.