कोलकाता – लग्नाच्या आधी वधू-वराच्या जन्मपत्रिका किती जुळते हे पाहण्याची परंपरा आता जुनी झाली आहे. आताच्या काळात थॅलेसिमिया, एचआयव्ही, हेपेटायसिस बी, हेपेटायसिस सी ची तपासणी केली जात आहे. परंतु कोलकाताच्या एका व्यक्तीने त्याहून एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी आपल्या भावी जावयाचा वीर्यतपासणीचा अहवाल मागितला आहे. आपत्य प्राप्तीसाठी भावी जावई सक्षम आहे का हे पाहण्यासाठी संबंधित व्यक्तीने अहवाल मागविला आहे. कोलकाताचे पार्क स्ट्रीटचे प्रसिद्ध गायनेकोलाजिस्ट डॉ. इंद्रनील साहा यांनी या घटनेबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
डॉ. साहा आपल्या पोस्टमध्ये लिहितात, काही दिवसांपूर्वी एक युवक त्यांच्याकडे शुक्राणूंच्या संख्येची तपासणी करण्यासाठी आला होता. त्याने सांगितले की त्यांच्या भावी सासर्यांनी ही मागणी केली आहे. ही गोष्ट ऐकून डॉ. साहा यांनाही आश्चर्य वाटले. डॉ. साहा यांनी युवकाला तपासणी अहवाल दिला. त्यांनी त्याचे नाव गुप्त ठेवले. संबंधित युवक आपत्यप्राप्तीसाठी सक्षम आहे का हेच त्याच्या सासर्यांना कदाचित तपासायचे असेल, असे डॉ. साहा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
डॉ. साहा म्हणाले, की या नंतर वर पक्षाने भावी वधूचा फॅलोपियन ट्यूब तपासणीचा अहवाल मागू नये म्हणजे झाले! एकमेकांबद्दलचे प्रेम आणि विश्वास यावरच खरे वैवाहिक जीवनाचे यश अवलंबून असते. ते जाणून घेण्यासाठी कोणत्याही परीक्षणाची गरज नाही, असे त्यांनी शेवटी म्हटले आहे. दरम्यान, पुरुषांच्या संघटनेने या घटनेची निषेध नोंदविला आहे. १९ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस आहे. त्यापूर्वी कोलकातामध्ये या अमानवीय घटनेची माहिती जगाला देणार आहोत, असे संघटनेने म्हटले आहे. तर दुसरीकडे युवतींनी वीर्यतपासणीचा अहवाल मागणे योग्य असल्याचे म्हटले आहे.