इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लग्नाची धांदल उडाली होती. वधू-वर पक्ष पाहुण्यांच्या सरबराईत होते. लग्न घटीका समीप आल्याने वधू वराची प्रतिक्षा करीत होती. मात्र, वर आपल्या मित्रांसमवेत नृत्यकलेचा अविष्कार दाखवत होता. यात वराला वेळेचा पुरता विसर पडला. आता नवरदेव येईल, मग नवरदेव येईल या प्रतिक्षेत असलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या संतापाचा कडेलोट झाला. वर मुलाच्या एकूण वागणुकीमुळे संतप्त झालेल्या वधू पक्षाने तत्काळ हा विवाह रद्द केला.
सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील ही घटना आहे. २२ एप्रिल रोजी विवाह संपन्न होणार होता. दुपारी साडेतीन वाजता लग्नाचा मुहुर्त होता. मात्र, वरमंडळी उशिरा आले. त्यामुळे विवाहापूर्वींच्या सर्वच विधींना उशिर होत गेला. हे प्रकरण एवढ्यावर थांबले नाही तर, वरात निघताच नवरदेवाचे मित्र पुढे आले. वेळेकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याने चार ते पाच तासांपेक्षा अधिक वेळ सर्वच खोळंबून बसले. यामुळे वधू पक्षाच्या संयमाचा कडेलोट झाला. दोन्ही पक्षात वादावाद झाली. अखेर हा विवाहच करायचा नसल्याची भूमिका घेत वधू पक्षाने वर पक्षाला काढता पाय घेण्यास सांगितले. नवरदेव आपल्या मित्रांसमवेत पुन्हा घरी एकटाच परतला. मात्र, वधू पक्षाने दुसऱ्या तरुणाची निवड केली. नवरीनेही त्याला पसंत केले. आणि त्याच मंडपात नवरीचा विवाह नियोजित नवरदेवाऐवजी ऐनवेळी दुसऱ्याच तरुणाशी करण्यात आला. त्यामुळे या विवाहाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.