इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लग्न समारंभ म्हणजे एक आनंददायी क्षण होय, परंतु उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक, दुर्देवी आणि वेदनादायी घटना घडली आहे. लग्नाची वरात निघणार होती. त्यामुळे मुंडावळ्या बांधत असतानाच नवरदेवाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना ऐकून नवरदेवाच्या आईवडिलांनी आणि कुटुंबीयांनी हंबरडाच फोडला. या दुर्देवी घटनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
वरातीऐवजी अंत्ययात्रा
अटवा गाव येथे ही दुर्देवी घटना घडली असून रामलाल यांचा मुलगा राजकमल याचा विवाह समारंभाची तयारी पार पडल्यानंतर अटैसा गावात त्याच्या लग्नाची वरात जाणार होती. हळदीचा कार्यक्रमही धुमधडाक्यात झाला होता. सर्व पाहूणे मंडळीही लग्नाला आले होते. त्यामुळे आता थोड्याच वेळात राजकमलची वरात निघणार होती. नवरदेव राजकमलचा मेकअप करण्यात येत होता. त्याला लग्नाचे कपडेही घालण्यात आले होते. त्यानंतर राजकमलच्या डोक्याला मुंडावळ्या बांधल्या जात होत्या.
मुंडावळ्या बांधत असतानाच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे तो खाली कोसळला. त्यामुळे त्याला तात्काळ उचलून एका आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच राजकमलला मृत घोषित करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे ज्या घरात लग्नाचा जल्लोष होता तिथे रडारड आणि आक्रोश सुरू झाला. जिथून वरात निघायची होती, त्या ठिकाणाहून नवरदेवाची अंत्ययात्रा निघाली.
वडिल कोसळलेच
आपल्या होणाऱ्या पतीच्या निधनाची ही धक्कादायक माहिती मिळताच वधूच्या घरची मंडळीही राजकमलच्या घरी पोहोचले. वास्तविक अशी धक्कादायक घटना घडेल याची कुणालाही कल्पना नव्हती. राजकमल याचा मृत्यू झाल्याने त्याच्या लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांना त्याच्या अंत्ययात्रेत सामील होण्याची वेळ आली. अत्यंत दु:खद अंतकरणाने सर्वांनी राजकमलला अखेरचा निरोप दिला. मुलाच्या निधनाने पिता रामलाल कोलमडून गेले आहेत. रडून रडून त्यांचे बेहाल झाले आहेत. आता आमचा सांभाळ कोण करेल असे ते म्हणत आहेत.
Wedding Ceremony Groom Heart Attack